
नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर (हिं.स.) पाकिस्तानने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्सच्या (WCL) तिसऱ्या हंगामातून माघार घेतली आहे. परिणामी, या लीगमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता कोणतेही सामने होणार नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तान चॅम्पियन्स लीग संघाला ना हरकत प्रमाणपत्र (NOC) नाकारल्यामुळे, संघाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
लीगच्या दुसऱ्या हंगामादरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानविरुद्ध खेळले नाहीत. तेव्हापासून, पीसीबीने पाकिस्तान चॅम्पियन्सवर स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घातली आहे. तांत्रिक कारणांमुळे पाकिस्तानी संघाचा बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना पुढे ढकलण्यात आला होता. आता, पाकिस्तानी संघ सहभागी होऊ शकणार नाही.
ना हरकत प्रमाणपत्राचा (NOC) हवाला देत पाकिस्तानने सोमवारी अधिकृतपणे लीगमधून माघार घेतली. पण, पीसीबी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास तयार होते, पण त्यांनी काही अटी घातल्याची माहिती आहे. या वृत्तानुसार, पीसीबीला भारतीय क्रिकेटपटूंकडून लेखी माफीनामा हवा होता. इतकेच नाही, तर सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करावे, अशीही त्यांची अपेक्षा होती. मात्र, डब्ल्यूसीएलच्या आयोजकांनी या मागण्या मान्य करण्यास नकार दिला, ज्यामुळे पाकिस्तानने माघार घेतली.
डब्ल्यूसीएलमधून माघार घेतल्यानंतर, पाकिस्तान चॅम्पियन्स संघानेही एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. आपल्या निवेदनात, पाकिस्तान चॅम्पियन्सने म्हटले आहे, पाकिस्तान चॅम्पियन्सला हे कळवताना दुःख होत आहे की, पीसीबीने एनओसी न दिल्यामुळे आम्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्समध्ये सहभागी होऊ शकणार नाही. आम्ही प्राधिकरणाच्या निर्णयाचा आदर करतो, पण साहजिकच त्यामुळे निराश झालो आहोत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे