
मुंबई, 05 ऑक्टोबर (हिं.स.)। अभिनेत्री आलिया भट्ट आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एकत्र काम करण्याच्या तयारीत आहेत. दोघेही बऱ्याच काळापासून रखडलेल्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाची नव्याने निर्मिती करण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. हा चित्रपट पहिल्यांदा २०१९ मध्ये सलमान खानसोबत जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा प्रकल्प रखडला. आता चित्रपटाच्या कथानकात आणि पटकथेत मोठे बदल करण्यात येत असून, सध्याच्या काळानुसार तो नव्या पद्धतीने सादर करण्याची तयारी सुरू आहे.
संजय लीला भन्साळी सध्या कलाकारांची निवड निश्चित करण्यापूर्वी चित्रपटाच्या कथेवर पुन्हा काम करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटात काही नवे चेहरे दिसण्याची शक्यता आहे. सलमान खान सध्या त्याच्या इतर प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे, तर शाहरुख खानकडूनही या चित्रपटासाठी अद्याप अंतिम संमती मिळालेली नाही. त्यामुळे निर्मात्यांची नजर युवा कलाकारांकडेही असू शकते. मात्र, चित्रपटातील नव्या कलाकारांविषयी अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांनी यापूर्वी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. दोघांचा आगामी ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपटही चर्चेत आहे. या चित्रपटात आलियासोबत रणबीर कपूर आणि विकी कौशल दिसणार आहेत. आलियाचा मागील ‘अल्फा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे भन्साळींसोबतच्या तिच्या संभाव्य पुढील चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule