
स्टॉकहोम, 05 ऑक्टोबर (हिं.स.)।सोमवारी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक तीन वैज्ञानिकांना प्रदान करण्यात आले. मेंदूतील वेगवेगळ्या चेतापेशींची (नर्व्ह सेल्स) क्रिया सुरू किंवा बंद करण्यासाठी मज्जासंस्थेवर नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीवर या तिन्ही वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे.
२०२६चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जर्मनीचे पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल तसेच अमेरिकेचे कार्ल डाइसेरोथ यांना प्रदान करण्यात आले आहे. या तिन्ही वैज्ञानिकांनी ‘लाइट-गेटेड आयन चॅनेल’ आणि ‘ऑप्टोजेनेटिक्स’ या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. ते जर्मनी आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत. नोबेल समितीने त्यांच्या संशोधनाचे कौतुक करत ‘एक्स’वर म्हटले की, मेंदूची गुपिते उलगडण्यासाठी या पद्धतीचा वापर आता जगभरातील प्रयोगशाळांमध्ये केला जात आहे.
नोबेल समितीनुसार, या तिन्ही वैज्ञानिकांच्या शोधामुळे मेंदू समजून घेण्यासाठी संशोधनाचा एक नवा मार्ग खुला झाला आहे. या शोधाचा उपयोग डोळ्यांशी संबंधित आजारांवरील संशोधनातही केला जात आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळवून देता येईल का, याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत.
या पुरस्काराची घोषणा स्टॉकहोम येथील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आली. याच घोषणेसोबत नोबेल पुरस्कार सप्ताहाची सुरुवात झाली. सोमवारी वैद्यकशास्त्रातील पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. शुक्रवारी शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर केला जाईल. त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी आर्थिक शास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode