
वॉशिंग्टन , 05 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेच्या हवाई दलाने इंग्लंडमधील आपल्या लष्करी तळावर तैनात असलेली बॉम्बर विमाने अमेरिकेत परत बोलावली आहेत. या तळाचा वापर इराणवरील हल्ल्यांसाठी केला जात होता. आरएएफ फेअरफोर्ड या तळावर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पेंटागॉनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही बॉम्बर विमाने अमेरिकेतील त्यांच्या तळावर परत पाठवण्यात आली आहेत. संवेदनशील लष्करी हालचालींबाबत माहिती देण्यास अधिकृत नसल्याने या अधिकाऱ्याने रविवारी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
‘मिलिटरी एअर ट्रॅकिंग अलायन्स’सारख्या विमानांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या समूहांनी इराणमधील युद्धाला सुरुवात झाल्यापासून आरएएफ फेअरफोर्ड तळावरून डझनभर बी-52 आणि बी-1 बॉम्बर विमानांचे संचालन होताना पाहिले आहे. रविवारीही काही बी-1 बॉम्बर विमाने या तळावरून उड्डाण करताना दिसली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधातील युद्धाबाबत विविध पर्यायांचा विचार करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये नव्या हल्ल्यांचाही समावेश आहे. मात्र, हे अभियान केवळ काही आठवडे चालेल, असे आश्वासन ट्रम्प यांनी सुरुवातीला अमेरिकन नागरिकांना दिले होते.
शनिवारी ट्रम्प यांनी इराणबाबत बोलताना म्हटले, “मला इराणबाबत काही निर्णय घ्यायचे आहेत. इराणचा मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. त्यामुळे आता प्रश्न एवढाच आहे की हे सोप्या मार्गाने होईल की कठीण मार्गाने.”दरम्यान, सप्टेंबरच्या अखेरीस आरएएफ फेअरफोर्ड येथे घडलेल्या सुरक्षा घटनेनंतर गेल्या आठवड्यात मध्य लंडनमध्ये एका ब्रिटिश-इराणी नागरिकाला दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या घटनेचा संबंध तेहरानशी जोडला आहे. मात्र, इराणने या घटनेतील सहभाग नाकारला आहे. दुसरीकडे, इराणने यापूर्वी आपल्या भूमीवर हल्ले करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही लष्करी तळाला वैध लक्ष्य मानले जाईल, असे म्हटले आहे.
ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणशी संबंधित प्रॉक्सी गट ब्रिटनसह इतर देशांमध्ये जाळपोळ आणि इतर हल्ल्यांमागे असल्याचे आढळून आले आहे. यातील अनेक हल्ल्यांचे लक्ष्य ज्यू समुदाय होता आणि त्यामागे भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा उद्देश होता.मध्यपूर्वेतील संघर्ष सुरू राहिल्यास तेहरान ब्रिटनमधील आपली लक्ष्ये वाढवू शकते, असा इशाराही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode