
इस्लामाबाद, 05 ऑक्टोबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. आपले नेते इमरान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी त्यांच्या हजारो समर्थकांनी रविवारी राजधानी इस्लामाबादच्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले.जेलमध्ये असलेले माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्ष आणि विद्यमान शाहबाज शरीफ सरकारमध्ये सुरू असलेली चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
इमरान खान यांच्या पक्षाचे सरकार असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मरवत जिल्ह्यातून मोठ्या मोर्चाला सुरुवात झाली. हजारो समर्थक ट्रक, बस आणि कारच्या लांबच लांब ताफ्यासह इस्लामाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. आयोजकांनी इस्लामाबादमध्ये पोहोचण्यापूर्वी मार्गात रात्री मुक्काम करण्याची योजना आखली आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री आणि इमरान खान यांचे कट्टर समर्थक सोहेल आफ्रिदी या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. इमरान खान यांचा मोठा फोटो असलेल्या कंटेनर ट्रकमधून बोलताना आफ्रिदी यांनी आंदोलनाच्या मागण्या राजधानीच्या केंद्रापर्यंत पोहोचवण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रदर्शनकर्त्यांना इस्लामाबादमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दल आणि प्रशासनाने कडक बंदोबस्त केला आहे. राजधानीच्या सर्व प्रवेशद्वारांवर तसेच शहरातील अनेक प्रमुख चौकांमध्ये शिपिंग कंटेनर ठेवून मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
मोर्चा पुढे ढकलण्याबाबत सरकार आणि पीटीआय नेत्यांमध्ये दोन फेऱ्यांची चर्चा झाली; मात्र त्यातून कोणतीही सहमती होऊ शकली नाही. पीटीआयचे अध्यक्ष गौहर खान यांनीही चर्चा निष्फळ ठरल्याची पुष्टी केली.पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी चर्चा फिस्कटल्याबद्दल खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले. तसेच या आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्यास त्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सरकारने देशाच्या उत्तर-पश्चिम भागात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)च्या वाढत्या दहशतवादी हल्ल्यांचा दाखला देत आंदोलन पुढे ढकलण्याचे आवाहन केले होते. तसेच पीटीआयवर दहशतवाद्यांबाबत सहानुभूतीची भूमिका घेतल्याचा आरोपही सरकारने केला आहे. पीटीआयच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, ते लाखो समर्थकांना एकत्र करून कोणत्याही परिस्थितीत इस्लामाबादमध्ये पोहोचतील. इमरान खान यांच्या सुटकेच्या मागणीसोबतच त्यांना तातडीने तुरुंगातून रुग्णालयात हलवावे आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच खासगी डॉक्टरांना त्यांची भेट घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही आंदोलक करत आहेत.
दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की इमरान खान पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय नियमितपणे त्यांची भेट घेतात. मात्र, तुरुंगातील भेटींचे रूपांतर राजकीय व्यासपीठात होऊ दिले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.हा मोर्चा यापूर्वी २७ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार होता. मात्र, अटक पुलासारखे महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आल्यानंतर तो पुढे ढकलण्यात आला होता.
इमरान खान यांच्या समर्थकांनी यापूर्वी केलेली आंदोलने अनेकदा हिंसक झाली आहेत. २०२४ मध्ये झालेल्या आंदोलनांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसह नागरिकांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे या नव्या मोर्चामुळे इस्लामाबादमधील संघर्ष आणि तणावाची परिस्थिती आणखी तीव्र झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode