
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.) भारतीय नौदलाच्या युद्धनौकांकरता ब्राह्मोस फायर कंट्रोल प्रणाली आणि प्रक्षेपकांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडसोबत (BAPL) एका करारावर स्वाक्षरी केली आहे. भारतीय डिझाइन, भारतात विकसित आणि निर्मित (IDDM - Indigenously Designed, Developed and Manufactured) या खरेदी श्रेणीअंतर्गत हा करार केला आहे. यासंबंधीचा कार्यक्रम 6 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्ली इथे पार पडला.हा करार एकूण 661.50 कोटी रुपये मूल्याचा असून, या करारावर संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या प्रकल्पाअंतर्गत किमान 68 टक्के स्वदेशी घटकांचा वापराचा अंतर्भाव आहे. यामुळे देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह विविध भारतीय उद्योगांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रकल्पामुळे तीन वर्षांच्या कालावधीत रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होतील.यासोबतच या प्रकल्पामुळे देशाची सागरी सुरक्षा यंत्रणा आणि संरक्षण क्षमताही अधिक भक्कम होणार आहे. हा प्रकल्प लष्करी तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्याच्या सध्याच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
देशाच्या सागरी सुरक्षा फळीत आघाडीवर तैनात असलेल्या विविध युद्धनौकांवर स्थापित केलेली ब्राह्मोस प्रणाली म्हणजे सागरी युद्ध मोहिमांसाठी भारतीय नौदलाची भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करण्याची क्षमता असलेली मुख्य पातळीवरची क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही शस्त्रास्त्र प्रणाली ध्वनीच्या अत्यूच्य वेगाने (सुपरसॉनिक) विस्तारीत क्षेत्रातील जमिनीवरील तसेच सागरी क्षेत्रातील लक्ष्यांवर अचूक मारा करण्याच्या क्षमतेने सज्ज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे