
* वैमानिक स्मित मच्छार यांनी कर्तृत्वातून भारतीय संस्कृतीचा गुण जगून दाखवला
बालाघाट, ६ ऑक्टोबर (हिं.स.) : इतरांसाठी त्याग, बलिदान आणि योगदान देणे हा भारतीय मातीचा गुण आहे. वैमानिक स्मित मच्छार यांनी आपल्या कर्तृत्वातून हा गुण प्रत्यक्ष जगून दाखवला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथे बाळासाहेब आणि भाऊराव देवरस स्मृती भवनाच्या लोकार्पणासह माधव नेत्रालयाच्या नेत्रचिकित्सा व नेत्रतपासणी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते. यावेळी माधव नेत्रालयाचे निखिल मुंडले, दीपक तामशेट्टीवार, डॉ. पवन स्थापत, अतुल शिरोळकर आणि पूर्वेंदू सक्सेना व्यासपीठावर उपस्थित होते.
भागवत म्हणाले की, इतरांसाठी सातत्याने त्याग आणि बलिदान करून त्यांचे जीवन सुखमय करण्यासाठी भारतीय माणूस जगत आला आहे. हा सेवाभाव भारतीय मातीच्या संस्कारातच आहे. त्यामुळेच गेल्या हजार वर्षांत जितके महापुरुष झाले नसतील, तितके महापुरुष अवघ्या दोनशे वर्षांत भारतात निर्माण झाले, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात न्यासाचे उपाध्यक्ष अरविंद मार्डीकर यांनी कै. बाळासाहेब आणि भाऊराव देवरस यांचे जीवनकार्य, तसेच कारंजा गावाशी असलेला त्यांचा ऋणानुबंध याबाबत माहिती दिली. भैय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली देवरस बंधूंच्या स्मृती जपण्यासाठी उभ्या राहिलेल्या 30 वर्षांच्या सेवा कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
या प्रास्ताविकेतील संदर्भ पुढे नेत भागवत म्हणाले की, भारतीय संस्कृतीत सेवा कार्य करणारा व्यक्ती कधीही अहंकारात राहत नाही. गरजवंतामध्ये नारायणाचे रूप पाहून त्याला मदत करण्याची सेवावृत्ती भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये आहे. बाळासाहेब आणि भाऊराव देवरस यांनी आपल्या आयुष्यात हीच सेवावृत्ती जोपासली.
भाऊराव देवरस यांनी झारखंडच्या दुर्गम भागात सरस्वती शिशू मंदिराच्या माध्यमातून वनवासी समाजासाठी केलेल्या शैक्षणिक कार्याचाही भागवत यांनी विशेष उल्लेख केला. तसेच एकल विद्यालयाच्या कार्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली, असे सांगत त्यांच्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
निस्पृह आणि निःस्वार्थ सेवेतून माणूस पिढ्यान्पिढ्या स्मरणात राहतो. त्यामुळे बाळासाहेब आणि भाऊराव देवरस यांनी ज्या भावनेतून सेवा कार्य केले, त्याच भावनेतून हे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही भागवत यांनी सांगितले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी