नवी मुंबई 5५ हजारांची लाच मागितली; ४३ हजार घेताना दोघे एसीबीच्या जाळ्यात
नवी मुंबई, 06 ऑक्टोबर (हिं.स.)। : माथाडी कामगार म्हणून नियुक्ती देण्यासाठी तसेच रजिस्टर पावतीवर सही करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४३ हजार रुपये स्वीकारणाऱ्या किराणा बाजार व दुकाने मंडळातील प्रभारी निरीक्षकासह सुरक्षा रक्षकाला
Bribe of ₹55,000 demanded; two nabbed by ACB while accepting ₹43,000.


नवी मुंबई, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।

: माथाडी कामगार म्हणून नियुक्ती देण्यासाठी तसेच रजिस्टर पावतीवर सही करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ४३ हजार रुपये स्वीकारणाऱ्या किराणा बाजार व दुकाने मंडळातील प्रभारी निरीक्षकासह सुरक्षा रक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. एपीएमसी फळ मार्केट, तुर्भे येथे ही कारवाई करण्यात आली.

भरत राजाराम कदम (५६), प्रभारी निरीक्षक, वर्ग-३, किराणा बाजार व दुकाने मंडळ, मुंबई आणि विजय नारायण पवार (३२), सुरक्षा रक्षक, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराच्या ओळखीच्या व्यक्तीने माथाडी कामगार म्हणून राजीनामा दिल्यानंतर त्याच्या जागी नियुक्ती मिळण्यासाठी तक्रारदाराने २९ ऑगस्ट २०२६ रोजी मंडळाकडे अर्ज केला होता. नियुक्तीसाठी आवश्यक रजिस्टर पावतीवर सही करण्याच्या बदल्यात सुरक्षा रक्षक विजय पवार याने स्वतःसाठी पाच हजार रुपये, तर प्रभारी निरीक्षक भरत कदम यांच्यासाठी ५० हजार रुपये, अशी एकूण ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली.

तक्रारीची ५ ऑक्टोबर रोजी पडताळणी केल्यानंतर दोघांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोड होऊन ४३ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. एसीबीने सापळा रचून मंडळाच्या कार्यालयातील केबिनमध्ये पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निता भासेले व त्यांच्या पथकाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande