
जळगाव, , 06 ऑक्टोबर (हिं.स.) प्रेमसंबंधाला विरोध केल्याने वारंवार धमकावून मानसिक त्रास दिल्याच्या आरोपातून 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील देवळवाडा परिसरात घडली. प्रशांत संजय सोनवणे (वय 28, रा. देऊळवाडा, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी 3 जणांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत सोनवणे याची मावस बहीण रोशनी अशोक ठाकरे हिचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रेमसंबंधाला प्रशांतचा विरोध होता. याच कारणावरून संदीप महाजन, विशाल महाजन तसेच त्यांच्या आईकडून प्रशांतला वारंवार अडवून धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, प्रशांतला रस्त्यात अडवून तसेच विविध ठिकाणी त्रास देण्यात येत होता. या सततच्या त्रासामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता, असा दावा करण्यात आला आहे. अखेर या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दि. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रशांतने आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिराच्या मागील शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर