
नाशिक, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।
- एका कंपनीचा फोटो व लोगो वापरून बनावटीकरण करून ऑर्डर वळवीत पैसे परस्पर घेत एका व्यापाऱ्याची २५ लाखांची फसवणूक केल्याची घटना अंबड एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणी कुटुंबातील चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की संशयित अरविंद जगन्नाथ बागूल यांना फिर्यादी सुनील जगन्नाथ बागूल यांनी आपल्या कंपनीचे कामकाज पाहण्याची जबाबदारी दिली होती. जून २०१६ ते मार्च २०१८ या कालावधीत संशयित अरविंद बागूल याने पूर्वेश अरविंद बागूल, नेहा पूर्वेश बागूल व सुरेखा अरविंद बागूल यांच्याशी संगनमत करून आसूआ इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना केली. या काळात अरविंद बागूलने फिर्यादी यांच्या कंपनीचा फोटो व लोगो वापरून सुनील बागूल यांच्या कंपनीच्या ऑर्डर वळवून घेतल्या. या ऑर्डर त्याने फिर्यादी यांच्या कंपनीतच तयार केल्या. बिल मात्र स्वतः ने स्थापन केलेल्या आसूआ इंजिनिअरिंगच्या नावाने दिले. अशा प्रकारे संशयित अरविंद बागूलने भावाच्या कंपनीच्या ऑर्डर वळवून ५५ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक करून या पैशांचा अपहार केला. दरम्यानच्या काळात त्याने कंपनीचा २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर सुनील जगन्नाथ बागूल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI