शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद; सेन्सेक्स ६८५ अंकांनी वधारला
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात मंगळवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सकारात्मक जागतिक संकेत, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि प्रमुख कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या सकारात्मक तिमाही अपडेटमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला
Stock Market Closing


नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात मंगळवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सकारात्मक जागतिक संकेत, कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती आणि प्रमुख कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या सकारात्मक तिमाही अपडेटमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला. त्याचा परिणाम म्हणून निफ्टी ५० निर्देशांक २२०.३५ अंकांनी म्हणजेच ०.९८ टक्क्यांनी वाढून २२,७७६.१० अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्समध्ये ६८५.३४ अंकांची म्हणजेच ०.९५ टक्क्यांची वाढ होऊन तो ७३,०६७.८१ अंकांवर स्थिरावला. महत्त्वाच्या केंद्रीय बँकेच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी बाजारातील सकारात्मक वातावरण कायम राहिले.

निफ्टी ५० मंगळवारी २२,६०३.२५ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात तो २२,५६१.६० अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. मात्र, त्यानंतर बाजारात सातत्याने खरेदीचा जोर वाढत गेला. दुपारच्या सत्रात निर्देशांकाने चांगली पुनरागमन करत २२,७३१.८५ अंकांची इंट्राडे उच्चांकी पातळी गाठली. अंतिम सत्रातही निफ्टी उच्च पातळीच्या आसपास टिकून राहिला. त्यामुळे बाजारात खरेदीचा सकारात्मक कल कायम असल्याचे दिसून आले. अखेर निफ्टीने २०० हून अधिक अंकांच्या वाढीसह व्यवहाराची सांगता केली.

बँक निफ्टीमध्येही ०.७६ टक्क्यांची वाढ झाली. बाजारातील अस्थिरतेचे मोजमाप करणारा इंडिया व्हीआयएक्स जवळपास आठ टक्क्यांनी घसरून १३.७ च्या खाली आला. व्यापक बाजारातही तेजीचे वातावरण राहिले. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक १.०८ टक्क्यांनी, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक १.५६ टक्क्यांनी वाढला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ११ पैकी आठ निर्देशांक तेजीत बंद झाले. निफ्टी फार्मा निर्देशांक १.६६ टक्क्यांनी वाढून आघाडीवर राहिला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबली. वॉकहार्टच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली. दुसरीकडे, निफ्टी आयटी निर्देशांक ०.५९ टक्क्यांनी घसरला.

वैयक्तिक शेअर्समध्ये अॅक्सिस बँकेचा शेअर २.११ टक्क्यांनी, तर कोटक महिंद्रा बँकेचा शेअर ३.८२ टक्क्यांनी वाढला. दोन्ही बँकांनी तिमाही कामगिरी आणि ठेवींमध्ये वाढ नोंदवल्याने त्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. ट्रेंटच्या शेअरमध्ये तब्बल १२.६४ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीने सप्टेंबर तिमाहीत एकल महसुलात वर्षभराच्या तुलनेत २३ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या शेअरमध्येही ४.०३ टक्क्यांची वाढ झाली.

निफ्टीच्या वाढीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा सर्वाधिक वाटा राहिला. कंपनीने निर्देशांकात ४६.०९ अंकांची भर घातली. कोटक महिंद्रा बँकेने २५.५२, तर ट्रेंटने २३.७६ अंकांचे योगदान दिले. दुसरीकडे, कोल इंडिया निफ्टीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरला. इन्फोसिसने ५.१३, तर आयटीसीने ४.६३ अंकांनी निर्देशांकाची वाढ रोखली.

बाजारातील एकूण स्थिती सकारात्मक राहिली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार झालेल्या ३,६९५ शेअर्सपैकी २,४५५ शेअर्स वधारले, तर १,१२५ शेअर्स घसरले आणि ११५ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. ९९ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर ११२ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नीचांक नोंदवला. याशिवाय १४४ शेअर्स अपर सर्किटमध्ये बंद झाले, तर १०० शेअर्स लोअर सर्किटला पोहोचले.

आदल्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स ४७२.७७ अंकांनी किंवा ०.६६ टक्क्यांनी वाढून ७२,३८२.४७ अंकांवर बंद झाला. एनएसई निफ्टी देखील १३३.८० अंकांनी किंवा ०.६० टक्क्यांनी वाढून २२,५५५.७५ अंकांवर बंद झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande