
ख्यातनाम अभिनेत्री ऐश्वर्या रायची 1994 मध्ये ‘मिस वर्ल्ड’ म्हणून निवड होण्यापूर्वी परीक्षकांनी तिला एक प्रश्न विचारला होता—“How will you live long after you are gone?” अर्थात, ‘तुम्ही या जगातून निघून गेल्यानंतरही तुमचे अस्तित्व कशातून जिवंत राहील?’ त्यावर ऐश्वर्या रायने एका शब्दात उत्तर दिले—‘नेत्रदान’. त्या उत्तराने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि तिने ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला. पुढे नेत्रदानाला प्रोत्साहन देणाऱ्या एका जाहिरातीत तिने हा किस्सा सांगितला होता.
माणूस या जगात किती वर्षे जगला, यापेक्षा तो गेल्यानंतर मागे काय ठेवून गेला, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला काही ना काही अर्थ, उद्देश आणि सामाजिक संदर्भ असतो. या जगात निरर्थक असे काहीच नसते. अनेकदा निस्पृह वृत्तीची मोठी माणसे आपल्या कार्याचा गाजावाजा करीत नाहीत. त्यांचे कार्य त्यांच्या बोलण्यात नव्हे, तर त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असते. म्हणूनच आपल्या पूर्वसुरींनी आणि पूर्वजांनी काय करून ठेवले आहे, याची जाणीव पुढच्या पिढीला असणे आवश्यक ठरते.
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे; घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे,’ या ओळींत दातृत्वाचा खरा अर्थ सामावलेला आहे. आपण कोणाकडून काही घेतले, तर त्याची परतफेड केवळ त्याच व्यक्तीला करणे आवश्यक नसते; त्या दातृत्वाची परंपरा पुढे नेणे, हेच त्याचे खरे ऋण फेडणे होय. एखाद्या पिढीने समाजाला काही दिले असेल, तर पुढच्या पिढीने त्या देण्याच्या वृत्तीचा वारसा स्वीकारणे, हीच त्या कार्याला मिळणारी खरी आदरांजली.
अध्यात्म आणि कर्मकांडाचे संदर्भ काही काळ बाजूला ठेवले, तरी पूर्वजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे गुण, त्यांचे विचार आणि त्यांनी उभे केलेले कार्य यांचे स्मरण करून त्यांच्या परंपरेचे पाईक होण्यासाठी पितृपक्षाचे महत्त्व अधोरेखित होते. स्मरण केवळ भूतकाळात रमण्यासाठी नसते; ते वर्तमानाला दिशा देण्यासाठी आणि भविष्याला संस्कार देण्यासाठी असते.
याच भावनेचा प्रत्यय पितृपंधरवड्यातील एका अनुकरणीय आणि अनुसरणीय सोहळ्यात आला. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथे बाळासाहेब आणि भाऊराव देवरस न्यासातर्फे 6 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने केवळ देवरस कुटुंबीय किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसमोरच नव्हे, तर ‘जेन-झी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या पिढीसमोरही सेवाभाव आणि त्यागाचा एक प्रेरणादायी आदर्श ठेवला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2025 मध्ये स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण केली असली, तरी संघाच्या पहिल्या दैनिक शाखेच्या प्रारंभाचे शताब्दी वर्ष 2026 मध्ये आले आहे. संघाची मुहूर्तमेढ 1925 मध्ये रोवली गेली; मात्र नागपूरच्या महाल परिसरातील मोहिते वाड्यात 1926 मध्ये पहिली दैनिक शाखा सुरू झाली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकत्वाचा श्रीगणेशा करणाऱ्यांमध्ये मधुकर दत्तात्रय देवरस म्हणजेच बाळासाहेब देवरस यांचा समावेश होता.
बाळासाहेब थेट आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या मुशीत घडले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर हेडगेवारांच्या विचारांचा आणि कार्यपद्धतीचा खोल ठसा उमटला होता. म्हणूनच पुढे ‘देवरस हे हेडगेवारांचे प्रतिरूप वाटतात,’ असे गोळवलकर गुरुजी म्हणत.
देवरस कुटुंबाचे मूळ आदिलाबाद येथील चेन्नूरू या गोदावरीच्या काठावरील गावात होते. त्या गावात ‘देवराजू’ आडनावाची सहा कुटुंबे होती. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी त्यांपैकी एका कुटुंबाने नागपूरचा मार्ग धरला. काळाच्या ओघात ‘देवराजू’चे ‘देवरस’ झाले आणि या कुटुंबाचा सामाजिक-सांस्कृतिक प्रवास नागपूरच्या भूमीत रुजला.
याच कुटुंबात पार्वतीबाई आणि दत्तात्रय यांच्या पोटी 11 डिसेंबर 1915 रोजी बाळासाहेब देवरस यांचा जन्म झाला. देवरस दाम्पत्याला चार मुले आणि पाच कन्या होत्या. त्यापैकी बाळासाहेब आणि त्यांचे धाकटे बंधू भाऊराव देवरस हे संघाच्या पहिल्या पिढीतील प्रचारक ठरले. पुढे बाळासाहेबांकडे सरसंघचालकपदाची जबाबदारी आली, तर भाऊराव संघाचे सहसरकार्यवाह म्हणून कार्यरत राहिले.
मात्र, देवरस बंधूंच्या जीवनाची खरी ओळख पदांमध्ये नव्हे, तर त्यांनी स्वीकारलेल्या जीवनव्रतात होती. बालाघाट जिल्ह्यातील कारंजा येथे देवरस कुटुंबाचे पिढीजात घर आणि शेती होती. बाळासाहेबांनी हे घर आणि शेती विकून त्यातून मिळालेला निधी संघकार्यासाठी वापरला. स्वतःच्या वाट्याला आलेली संपत्ती सार्वजनिक कार्यासाठी अर्पण करण्यामागे त्यांची निस्पृहता आणि राष्ट्रकार्यावरील निष्ठा दिसून येते.
बाळासाहेब देवरस यांचे 1996 मध्ये देहावसान झाले. त्यानंतर भैय्याजी जोशी यांच्या पुढाकारातून 1997 मध्ये बाळासाहेब देवरस आणि भाऊराव देवरस न्यासाची स्थापना झाली. या न्यासाने देवरस कुटुंबीयांचे घर आणि जमीन खरेदी करून त्या जागेवर त्यांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरू केले. कालांतराने स्मृती जपण्याच्या या प्रयत्नाला सेवाकार्याची जोड मिळाली आणि त्याच भूमीत ‘माधव नेत्रालया’च्या माध्यमातून कारंजा परिसरातील नागरिकांसाठी नेत्रचिकित्सा व अत्याधुनिक नेत्रतपासणीची सुविधा उभी राहिली.
म्हणजेच, ज्या भूमीत एका पिढीने आपल्या घरादाराचा त्याग करून समाजकार्याचा मार्ग स्वीकारला, त्याच भूमीत पुढच्या पिढीसाठी आरोग्यसेवेचे दालन खुले झाले. स्मृतीचे सेवेत आणि वारशाचे समाजोपयोगी कार्यात रूपांतर होणे, यापेक्षा त्या स्मृतीला अधिक अर्थपूर्ण अभिवादन कोणते असू शकते?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या हस्ते 6 ऑक्टोबर 2026 रोजी ‘बाळासाहेब आणि भाऊराव देवरस स्मृती भवन’चे लोकार्पण करण्यात आले. याच वेळी ‘माधव नेत्रालया’च्या नेत्रोपचार आणि तपासणी केंद्राचाही शुभारंभ झाला.
या सोहळ्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सरसंघचालकांनी रूपकांच्या माध्यमातून देवरस बंधूंचे कर्तृत्व आणि त्यांच्याकडून आलेला वारसा पुढील पिढीने कसा जपावा, याचे विवेचन केले.
यावेळी त्यांनी चिनी प्रवासी युवानश्वांगच्या भारतभ्रमणाचा संदर्भ दिला. भारतभ्रमण करून मायदेशी परतताना तो एका नौकेतून गंगा नदी ओलांडत होता. पाण्याचा प्रवाह आणि सामानाच्या वजनामुळे नौका डोलू लागली. त्याच्याकडे मोठ्या प्रयत्नांनी गोळा केलेली ग्रंथसंपदा होती. नौकेचे वजन कमी करण्यासाठी ती ग्रंथसंपदा नदीत सोडावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, त्याला निरोप देण्यासाठी आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले. त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि स्वतःचे वजन नौकेबाहेर नेऊन नौकेवरील भार कमी केला. त्यामुळे युवानश्वांगला आपली मौल्यवान ग्रंथसंपदा सुरक्षितपणे मायदेशी नेता आली.
इतरांसाठी स्वतःचा त्याग करण्याची ही वृत्ती भारतीय संस्कृतीच्या मनोभूमीत खोलवर रुजलेली आहे आणि काळ बदलला तरी तिचे अस्तित्व कायम आहे, असे सांगताना सरसंघचालकांनी अलीकडील एका विमान दुर्घटनेतील भारतीय वैमानिकाच्या धैर्याचाही दाखला दिला. स्वतःवर चाकूहल्ला झाला असतानाही शेकडो विमानप्रवाशांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे उदाहरण देत त्यांनी परोपकार आणि दुसऱ्याच्या जीवासाठी स्वतःचे प्राण पणाला लावण्याची भारतीय परंपरा आजही जिवंत असल्याचे अधोरेखित केले.
बाळासाहेब आणि भाऊराव देवरस यांच्या जीवनाचे स्मरण करताना डॉ. भागवत यांनी या दोन्ही बंधूंनी आपले जीवन राष्ट्र आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केल्याचे नमूद केले. कारंजा येथे उभारण्यात आलेल्या स्मृती भवनाची रचना त्यांच्या जीवनातील आठवणी, विचार आणि सेवाकार्य जतन करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘माधव नेत्रालया’च्या माध्यमातून ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना नेत्रोपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमात बाळासाहेब व भाऊराव देवरस न्यासाचे उपाध्यक्ष अरविंद मार्डीकर यांनी न्यासाच्या 30 वर्षांच्या प्रवासाची माहिती दिली. तीन दशकांच्या या प्रवासाकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—स्मृती जर केवळ स्मारकात बंदिस्त राहिली, तर ती हळूहळू इतिहासाचा भाग बनते; पण स्मृतीचे रूपांतर सेवेत झाले, तर ती वर्तमानात श्वास घेते आणि भविष्याला प्रेरणा देते.
म्हणूनच सेवा, त्याग, बलिदान आणि परोपकाराची ही परंपरा एखाद्या कुटुंबापुरती, संस्थेपुरती किंवा काही मोजक्या व्यक्तींपुरती मर्यादित राहू नये, तर अधिकाधिक लोकांनी तिचा स्वीकार करून हा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. देवरस बंधूंनी रोवलेल्या सेवाकार्याच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात व्हावे आणि त्याच्या विस्तारासाठी समाजातून सामूहिक प्रयत्न व योगदान मिळावे, ही अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
खरे तर पितृस्मरणाचा अर्थ केवळ पूर्वजांचे नाव घेणे नाही. त्यांच्या स्मृतीला आपल्या कृतीत उतरवणे, त्यांच्या मूल्यांना वर्तमानात जगणे आणि त्यांच्या कार्याची दिशा पुढे नेणे, हेच त्या स्मरणाचे सार आहे. पूर्वजांनी आपल्यासाठी काय ठेवले, हा प्रश्न महत्त्वाचा असला, तरी आपण पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत, हा प्रश्न त्याहून अधिक महत्त्वाचा आहे.
कारंजाच्या मातीत देवरस कुटुंबाच्या पिढीजात वास्तूची स्मृती आहे; त्या मातीत त्यागाची कहाणी आहे; आणि आता त्याच भूमीत सेवाकार्याचे नवे पर्व आकार घेत आहे. पितृपक्षातील एकादशीच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण करताना देवरस बंधूंनी निर्माण केलेल्या सेवाभावाचा मृद्गंध या मातीत पुन्हा एकदा दरवळला.
संस्था आणि न्यासाचे कार्य यापुढेही अव्याहत सुरू राहील, यात शंका नाही. पण या सोहळ्याचे खरे फलित केवळ एका स्मृती भवनाच्या लोकार्पणात किंवा एका नेत्रतपासणी केंद्राच्या शुभारंभात नाही. त्यापलीकडे जाऊन, एका पिढीने केलेला त्याग पुढच्या पिढीच्या सेवाव्रतात परिवर्तित होणे, हेच या सोहळ्याचे मोठेपण आहे.
ऐश्वर्या रायच्या ‘नेत्रदान’ या एका शब्दापासून सुरू झालेला विचार अखेरीस देवरस बंधूंच्या सेवाकार्यापर्यंत येऊन पोहोचतो. शरीर गेल्यानंतरही डोळे दुसऱ्याला दृष्टी देऊ शकतात; संपत्ती समाजकार्यासाठी उपयोगी पडू शकते; विचार पुढच्या पिढीला दिशा देऊ शकतात; आणि एखाद्याचे संपूर्ण जीवनच सेवाभावाचा दीपस्तंभ बनू शकते.
माणूस जगातून निघून गेल्यानंतरही जगत राहतो, तो त्याने मागे ठेवलेल्या कार्यातून. म्हणूनच पितृस्मरणाची खरी परंपरा कदाचित एवढीच—पूर्वजांनी दिलेले हात आपण पुढच्या पिढीच्या हातात द्यायचे आणि ‘देणाऱ्याचे हात’ पुढे नेत राहायचे.
— मनीष कुलकर्णी
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी