अपघातामुळे गुटखा तस्करीचा भंडाफोड; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव, ८ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात निंभोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली. अपघाताच्या निमित्ताने उघडकीस आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी चारचाकी वाहना
अपघातामुळे गुटखा तस्करीचा भंडाफोड; ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त


जळगाव, ८ ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात निंभोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली. अपघाताच्या निमित्ताने उघडकीस आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी चारचाकी वाहनासह तब्बल ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, छत्रपती संभाजीनगर येथील दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.

निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव फाटा, ता. रावेर येथे सकाळच्या सुमारास सिल्वर-गोल्ड रंगाच्या ह्युंदाई आय-१० कारने (क्र. एमएच-२६-व्ही-४४२३) सोनालिका कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाची प्राथमिक तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध प्रकारचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.

या प्रकरणी अजीम तैय्यब सय्यद (२३, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुद्दस्सिर कासिम (२३, रा. इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशीदजवळ, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ लाख ९० हजार ४४० रुपये किमतीचा गुटखा-पानमसाला तसेच १ लाख ८० हजार रुपये किमतीची ह्युंदाई आय-१० कार असा एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला नेमका कुठून आणण्यात आला होता, त्याचा पुरवठा कोण करत होते आणि या अवैध तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

या अवैध तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा पुढील पुरवठा कुठे केला जाणार होता, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande