परळीतील मोबाईल शॉपी फोडणारा परभणीचा चोरटा जेरबंद
बीड, 08 ऑक्टोबर, (हिं.स.)। परळी शहरातील मोबाईल शॉपीचा पत्रा कापून तब्बल १० लाख ३१ हजार ४२० रुपयांचे ७५ मोबाईल चोरून नेणाऱ्या परभणी येथील आरोपीला संभाजीनगर परळी वैजनाथ पोलिसांनी अवघ्या एका दिवसात जेरबंद केले. तांत्रिक तपासासह रेल्वे स्थानकापासून परभ
पोलीस कारवाई


बीड, 08 ऑक्टोबर, (हिं.स.)। परळी शहरातील मोबाईल शॉपीचा पत्रा कापून तब्बल १० लाख ३१ हजार ४२० रुपयांचे ७५ मोबाईल चोरून नेणाऱ्या परभणी येथील आरोपीला संभाजीनगर परळी वैजनाथ पोलिसांनी अवघ्या एका दिवसात जेरबंद केले. तांत्रिक तपासासह रेल्वे स्थानकापासून परभणीपर्यंत तब्बल २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून पोलिसांनी आरोपीपर्यंत धडक मारली.

संभाजीनगर परळी वैजनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुरनं. २३८/२०२६, कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. २०२३ अन्वये ४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अज्ञात चोरट्याने मोबाईल दुकानाचा पत्रा कापून आत प्रवेश केला आणि विक्री तसेच दुरुस्तीसाठी आलेले नवीन व जुने मोबाईल असा १० लाख ३१ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि अनमोल केदार यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. परळी शहरातील विविध ठिकाणांसह परळी रेल्वे स्थानक ते परभणी दरम्यानचे २५० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्याचबरोबर गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. आरोपी परभणी जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचे पथक परभणीत दाखल झाले.

तपासा दरम्यान शाहरुख हमीद शेख (रा. सरफराज नगर, परभणी) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने परळीतील चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेले नवीन व जुने मिळून ७५ मोबाईल, किंमत १० लाख ३१ हजार ४२० रुपये, तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

माजलगावातील चोरीचाही उलगडा

आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुरनं. २८०/२०२६, कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. अन्वये २५ ऑगस्ट रोजी घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे माजलगावातील चोरीचा गुन्हाही उघडकीस आला आहे. आरोपीला परळी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि पुजरवाड करीत आहेत.

या कारवाईत पोउपनि पुजरवाड, ग्रेड पोउपनि नागरगोजे, पोशि/७१० चव्हाण, पोशि/११०९ घुगे, पोशि/१७२१ डोंगळे आणि पोशि/२०५४ ठोंबरे यांनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande