मला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, पण शक्यता खूपच कमी आहे- ट्रम्प
वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, असे सांगत आले आहेत. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी हीच इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, यावेळी त्यांनी हा पुरस्कार मिळण्याबाबत शंक
मला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, पण शक्यता खूपच कमी आहे- ट्रम्प


वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्याला नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा, असे सांगत आले आहेत. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी हीच इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, यावेळी त्यांनी हा पुरस्कार मिळण्याबाबत शंकाही व्यक्त केली आहे.

२०२६ मध्ये मिळणाऱ्या नोबेल शांतता पुरस्काराबाबत ट्रम्प म्हणाले, “समितीचा निर्णय काय असेल, हे मला माहीत नाही. नॉर्वेजियन नोबेल समिती शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा करणार आहे. त्यांची अशी प्रतिमा आहे की, कदाचित ते माझ्यासारख्या व्यक्तींना हा पुरस्कार देत नाहीत.”व्हाइट हाऊसमध्ये पुनरागमन केल्यापासून ट्रम्प वारंवार म्हणत आहेत की, जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी आपण पात्र आहोत.

ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “आता ती वेळ आली आहे. मात्र, मागील वेळी हा पुरस्कार मिळवलेल्या व्यक्तीकडून अप्रत्यक्षपणे तो मिळाल्याने मला खूप सन्मान वाटला. त्यांनी म्हटले होते की, इतिहासात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापेक्षा या पुरस्कारासाठी अधिक पात्र दुसरी कोणतीही व्यक्ती नाही.”

व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता. व्हेनेझुएलातील आपल्या प्रयत्नांसाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळावा, या उद्देशाने त्यांनी नोबेल पुरस्काराचे पदक ट्रम्प यांना दिले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक संघर्ष सोडविल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा आहे की, त्यांनी जगातील अनेक युद्धे थांबवली आहेत.कंबोडिया, इस्रायल आणि पाकिस्तानच्या नेत्यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दिल्याचे म्हटले आहे. मात्र, याची अधिकृत पुष्टी करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही.मात्र, ट्रम्प यांना रशिया-युक्रेन युद्धाचा तोडगा काढण्यात अद्याप यश आलेले नाही. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी हे युद्ध संपवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

याच वर्षी ट्रम्प यांच्या निर्देशानुसार अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर हल्ला केला. त्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी बिघडली आहे. जगभरातील तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला असून, त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.यंदाच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत पोप लिओ, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय (ICC) आणि पॅलेस्टिनी प्रदेशांसाठीचे विशेष प्रतिनिधी यांसारख्या नावांचा प्रामुख्याने समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande