
मनीला, ८ ऑक्टोबर (हिं.स.). फिलिपिन्सच्या मिंडानाओ बेटाला गुरुवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेस (जेएफझी) नुसार भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल इतकी होती आणि त्याचा केंद्रबिंदू सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता. फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनॉलॉजी अँड सिस्मॉलॉजीने (फिव्होल्स) या भूकंपाची तीव्रता ५.६ Mw आणि खोली २६ किलोमीटर नोंदवली आहे.
फिव्होलनुसार हा भूकंप जून २०२६ मध्ये सारंगानी आणि दावाओ ऑक्सिडेंटल परिसरात झालेल्या मोठ्या भूकंपांच्या मालिकेतील आफ्टरशॉक आहे. फिव्होलने या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, भूकंपानंतर आणखी आफ्टरशॉक्स जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भूकंपाचे धक्के सारंगानी, जनरल सॅंटोस सिटी आणि दक्षिण कोटाबातो परिसरातील काही भागांत जाणवले. फिव्होलच्या नोंदीनुसार काही ठिकाणी तीव्रता पाचपर्यंत जाणवली.
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. उपलब्ध माहितीनुसार भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची नोंद झालेली नाही.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode