

श्रीजीत नाईक नाबाद १३९ व रियांश बॅनर्जीचे ६ बळी
नाशिक, 08 ऑक्टोबर (हिं.स.)।
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, खास १२ वर्षांखालील वयोगटासाठीच्या क्रिकेटपटुंसाठी एन डी सी ए डॉ. विनायक भांडारकर स्मृति चषक- मेमोरियल- मान्सून लीग क्रिकेट स्पर्धा महात्मनगर क्रिकेट मैदानावर रंगत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी १२ वर्षांखालील वयोगटासाठीची हि स्पर्धा आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली आहे. या १२ वर्षांखालील मान्सून लीग बरोबरच डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी १४ व १६ वर्षांखालील वयोगटातील स्पर्धा देखील कै. डॉ. विनायक दोधुशेठ भांडारकर यांच्या स्मृति प्रीत्यर्थ प्रायोजित केली आहे. याबद्दल एन डी सी ए ने त्यांचे खास आभार मानले आहेत. २५ षटकांच्या स्वरूपात सदर स्पर्धा खेळवली जात असून यात तब्बल ३६ संघ अतिशय उत्साहाने सहभागी झाले आहेत.या संघांचे ९ गट केले असून प्रत्येक संघ सुरवातीला ३ साखळी सामने खेळेल.
यात केन्सिंग्टन क्रिकेट क्लबच्या श्रीजीत नाईकने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केवळ ६५ चेंडूत २६ चौकरांसह घणाघाती नाबाद १३९ धावा फटकावल्या. या जोरावर केन्सिंग्टनने ४ बाद २५७ धावा करून एन डी सी ए नून संघावर २१६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. तर ग्रिफीन क्रिकेट अकादमीच्या रियांश बॅनर्जीने आपल्या भेदक लेगस्पिन गोलंदाजीने क्रिकेट कल्चर ऑफ इंडिया संघाची दाणादाण उडवत ६ बळी टिपले. प्रथम फलंदाजी करून ग्रिफीनने २६२ धावा केल्या होत्या. रियांशच्या ३.४ षटके २ निर्धाव ३ धावा व ६ बळी या अफलातून कामगिरीच्या जोरावर ग्रिफीनने सी सी ऑफ इंडिया वर १८० धावांनी मोठा विजय मिळवला.
---
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI