ऑस्ट्रेलिया अ संघाचा भारत अ वर ६९ धावांनी विजय
रजत पाटीदारचे अर्धशतक व्यर्थ; ऑस्ट्रेलियाची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी पुडुचेरी, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। तीन सामन्यांच्या अनधिकृत एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा ६९ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्र
Australia A defeats India A by 69 runs


रजत पाटीदारचे अर्धशतक व्यर्थ; ऑस्ट्रेलियाची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी

पुडुचेरी, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। तीन सामन्यांच्या अनधिकृत एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा ६९ धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलिया अ संघाने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली. भारत अ संघाकडून रजत पाटीदारने ६७ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली, तर अनुकूल रॉयने नाबाद ३४ धावा केल्या. मात्र, अन्य फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनने तीन बळी घेत भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याच्या प्रभावी गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया अ संघाने ४९.५ षटकांत सर्वबाद २७५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सॅम कॉन्स्टास आणि जोश फिलिप यांनी अर्धशतके झळकावत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. कॉन्स्टासने ६७ धावांची खेळी केली, तर फिलिपने ५८ धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. कर्णधार नॅथन मॅकस्वीनीने ३२ धावा केल्या, तर मिचेल ओवेनने २५ धावांचे योगदान दिले.

भारत अ संघाकडून अर्शद खानने प्रभावी गोलंदाजी करत सर्वाधिक तीन बळी घेतले. यश ठाकूरने दोन फलंदाजांना बाद केले. विप्रज निगम, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिस्पर्धी संघाने २७५ धावांपर्यंत मजल मारली.

२७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत अ संघाचा डाव ४५.२ षटकांत २०६ धावांवर आटोपला. सलामीवीर साई सुदर्शनला केवळ १३ धावा करता आल्या, तर देवदत्त पडिक्कल अवघ्या एका धावेवर बाद झाला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने १२ धावा केल्या. त्यानंतर रजत पाटीदारने डाव सावरण्याचा प्रयत्न करत ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कुमार कुशाग्रने १७, निशांत सिंधूने १३ आणि विप्रज निगमने २३ धावा केल्या.

खालच्या फळीत अनुकूल रॉयने नाबाद ३४ धावा करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाकडून स्पेन्सर जॉन्सनने तीन बळी घेत भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. परिणामी भारताचा डाव निर्धारित लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच संपुष्टात आला. या पराभवामुळे भारत अ संघाला मालिकेतील शेवटचा सामना प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळावा लागणार आहे, तर ऑस्ट्रेलिया अ संघाने दुसऱ्या विजयासह मालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande