
लातूर, 09 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर पोलीस दलातील शारीरिक क्षमता, जिद्द, शिस्त आणि संघभावनेचा प्रत्यय देणाऱ्या ३० व्या लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ मध्ये पोलीस खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली. धावण्याच्या शर्यतींपासून लांबउडी, गोळाफेक आणि सांघिक खेळांपर्यंत खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध केले. विशेषतः पोलीस मुख्यालयाच्या संघाने फुटबॉल, खो-खो आणि कबड्डी या तीन सांघिक क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व अधोरेखित केले.
पोलीस मुख्यालय, लातूर येथील कवायत मैदानावर ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान आयोजित या स्पर्धेत सुमारे १२५ पोलीस अधिकारी, अंमलदार आणि महिला खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. पोलीस दलातील अधिकारी-अंमलदारांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखणे, कर्तव्याच्या धकाधकीतून त्यांना क्रीडेद्वारे नवचैतन्य मिळवून देणे तसेच संघभावना आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
*वैयक्तिक क्रीडा प्रकारांत खेळाडूंची चमक.*
लांबउडी पुरुष गटात
रहीम अमीन पठाण यांनी प्रथम, तर मेहराज आरिफ शेख यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. महिला गटात आशिया रशीद मसूलदार यांनी प्रथम, तर पूजा सुखदेव नलावडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
५ हजार मीटर धावण्याच्या पुरुष गटात आदित्य पांडुरंग पिठले यांनी प्रथम, तर मुसीब महमूद पठाण यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. महिला गटात आफ्रिन नवाबसाब शेख यांनी प्रथम, तर वैशाली संतोष शेटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
२०० मीटर धावण्याच्या पुरुष गटात सूरज मनमत सोनटक्के यांनी प्रथम, तर अजय चंद्रकांत पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. महिला गटात ऐश्वर्या नागनाथ शिवयोगी यांनी प्रथम, तर आफ्रिन नवाबसाब शेख यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
गोळाफेक पुरुष गटात सद्दाम खलील शेख यांनी प्रथम, तर बालाजी रावण घोरबंड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. महिला गटात फरहाणा कलीम मौजम यांनी प्रथम, तर गोदावरी एकनाथ एनकुरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
*सांघिक खेळांत पोलीस मुख्यालयाचे वर्चस्व.*
सांघिक क्रीडा प्रकारांत पोलीस मुख्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. फुटबॉलमध्ये पोलीस मुख्यालय संघाने प्रथम, तर अहमदपूर विभागीय संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. खो-खोमध्ये पोलीस मुख्यालय संघाने प्रथम, तर उपविभाग निलंगा संघाने तृतीय क्रमांक पटकावला. कबड्डीमध्ये पोलीस मुख्यालय संघाने प्रथम, तर चाकूर उपविभाग संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
कर्तव्य बजावताना सतत दक्ष राहणाऱ्या पोलीस अधिकारी-अंमलदारांसाठी अशा क्रीडा स्पर्धा शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक प्रसन्नता, सकारात्मक ऊर्जा आणि परस्पर समन्वय वाढविण्यास उपयुक्त ठरतात. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुढील स्तरावरील पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis