
लातूर, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।
चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या. दुष्काळी उपाययोजनांबाबत २५ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असतानाही गंभीर दुष्काळग्रस्त भागात आवश्यक पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल त्यांनी खेद ही व्यक्त केला.
मराठवाडा दौऱ्यादरम्यान उदगीर तालुक्यातील करडखेल आणि दिग्रज येथील शेतांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नांचा आढावा घेतला.
शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली व शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सोबत माजी आमदार सुधाकर भालेराव, संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, संगीता चव्हाण, सुनीता मोरे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोळ, सरपंच पांडुरंग ढगे, शेतकरी बापुराव माने, श्रीकांत कोंबले, विकास सोसायटीचे चेअरमन कुमार पाटील, बालाजी पडोळे, रोगनाथ गंगाराम ढगे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis