दर्यापुरात सुवर्णकाराकडे दरोडा टाकणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का
अमरावती, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। दर्यापूर येथील ज्वेलर्सकडे दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दर्यापूर येथील गोविंद गजानन माहोरे यांच्या ज्वेलरी दुकानात एक ऑगस्ट २०२६ रोजी स
दर्यापुरात सुवर्णकाराकडे दरोडा टाकणाऱ्या टोळीविरुद्ध मोक्का


अमरावती, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। दर्यापूर येथील ज्वेलर्सकडे दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या टोळीवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दर्यापूर येथील गोविंद गजानन माहोरे यांच्या ज्वेलरी दुकानात एक ऑगस्ट २०२६ रोजी संशयित जितेंद्र मनसाराम चव्हाण (रा. उमरी, अकोट), शुभम संतोष चांदूरकर (रा. वाडी, खामगाव), अजय मोहन तायडे, विश्वजित विठ्ठलसिंग सिसोदे (सर्व रा. खामगाव) व दिनेश ऊर्फ दिनकर आप्पा नराळे (रा. सातारा) आदींनी शस्त्रांच्या धाकावर सोन्याचांदीचे मौल्यवान दागिने लुटून नेले होते.

स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणाचा समानांतर तपास करून त्यातील संशयित जितेंद्र मनसाराम चव्हाण, शुभम संतोष चांदूरकर व अजय मोहन तायडे या तिघांना अटक करून गुन्ह्यातील ऐवज जप्त करण्यात आला होता. दर्यापुरातील दरोड्यानंतर पोलिसांनी या टोळीचा इतिहास तपासला असता, त्यांच्यावर विविध जिल्ह्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही गुन्हे स्वतंत्रपणे, तर बरेच गुन्हे टोळीतील सदस्यांना सोबत घेऊन करण्यात आले. मागील दहा वर्षांपासून हिंसा, हिंसेची धमकी, जबरदस्ती किंवा बेकायदेशीर मार्गाचा वापर करून सातत्याने संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे दिसून आलेले आहे.

या टोळीचा उद्देश वर्चस्व प्रस्थापित करणे, स्वत:साठी आर्थिक लाभ व इतर फायदे मिळवणे असल्याचे त्यात दिसून आले. त्यामुळे दर्यापूर पोलिसांनी पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्याकडे महाराष्ट्र, संघटित गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी संबंधितांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता, त्याला मान्यता देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande