
नवी मुंबई, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। मराठी भाषा, संतसाहित्य आणि संगीतपरंपरेचा समृद्ध वारसा उलगडणारा ‘मराठी माझी देवालाही आवडे’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या सोहळ्यात रसिकांना अभिजात मराठी भाषेचा गौरवशाली प्रवास अनुभवता येईल.
मराठी भाषेतील भक्तिरचना, संतांची शिकवण आणि संगीतपरंपरेतील भावसौंदर्य यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात साधण्यात आला आहे. या सांगीतिक मैफलीत कल्पिता राणे यांचे नृत्याविष्कार सादर होणार असून डॉ. राम पंडित आणि तन्वी गोरे आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन कल्पिता राणे यांचे असून ‘कल्पांगण सांस्कृतिक केंद्र’ हे सादरकर्ते आहेत. त्यांना किरण चिटणीस (तबला), मंदार जाधव (पखवाज) आणि ओमकार चव्हाण (कीबोर्ड) यांची संगीतसाथ लाभणार आहे. तसेच परिन मोरे, अमलेंदु जोशी यांचाही सहभाग असून कलाकारांचे संयोजन महेश चव्हाण यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे. मराठी भाषेचे संवर्धन आणि संतपरंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य असून काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विनामूल्य प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून रसिकांनी या सांगीतिक पर्वणीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)