
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात वन्यजीव सप्ताहाची सांगता
नाशिक, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।
वन्यजीव सप्ताह साजरा करताना वन्यजीव, वनसंपदा आणि पर्यावरणाचे मानवी जीवनातील महत्त्व तसेच निसर्ग सहल व पक्षीनिरीक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभयारण्यातील जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. वन्यजीवांचे संरक्षण आणि नैसर्गिक अधिवासाचे संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
वन्यजीव सप्ताहाची सांगता कार्यक्रम खानगाव थडी कॅम्प व चापडगाव कॅम्प येथे कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालय, निफाड येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या निसर्ग सहल, पक्षीनिरीक्षण व अभ्यास दौऱ्याने करण्यात आली. यावेळी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रवीण शेलार, जितेंद्र डेर्ले, मालती बावरे, प्रा. प्रिया धाराराव, प्रा. एस. आर. नाठे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या इन्फॉर्मेशन ऑफिसर श्रीमती नताशा गिरकर तसेच वनरक्षक गोरख पाटील, कैलास सद्गिर यांच्यासह अभयारण्याचे संरक्षण पथकातील कर्मचारी, निसर्ग मार्गदर्शक आणि बीएनएचएसचे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ताकाका उगांवकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबईचे प्रोग्राम ऑफिसर नंदकिशोर दुधे तसेच वनपाल राजेंद्र दोंड यांनी उपस्थित प्राध्यापक, विद्यार्थी आणि बीएनएचएसच्या प्रशिक्षणार्थींना नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील जैवविविधता, वन्यजीव व पक्षी संपदा याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI