
लातूर, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।
उदगीर तालुक्यात कथित विनापरवाना सावकारी व्यवहाराच्या तक्रारीवरून सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) छापा टाकून झडती व तपासणी केली. या कारवाईत व्याजाच्या नोंदी असलेल्या हिशोब वह्या, विविध दस्तऐवज आणि त्यांच्या प्रती पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
बिदर गेट, साई नगर, उदगीर येथील रहिवासी संभाजी नागप्पा खिंडीवाले यांच्या विरोधात सहकार विभागाकडे कथित विनापरवाना सावकारी व्यवहारासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम १६ अन्वये ही कारवाई करण्यात आली.
झडतीदरम्यान मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणातील सावकारी व्यवहारांचे स्वरूप आणि कायद्याचे उल्लंघन झाले आहे का, याबाबत पुढील तपासानंतर स्पष्टता येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण आणि जिल्हा उपनिबंधक विष्णू पोतांगळे यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबवण्यात आली. उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर आणि उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी प्रशासकीय सहकार्य केले.
प्रत्यक्ष कारवाईत सहकार अधिकारी श्रेणी-२ तथा पथकप्रमुख व्ही. एन. विभुते, कनिष्ठ लिपिक एम. बी. सुवर्णकार आणि कनिष्ठ लिपिक डी. ए. गायकवाड यांनी सहभाग घेतला. पोलीस विभागाने सुरक्षाव्यवस्था पुरवली, तर शासकीय दूध योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी पंच म्हणून काम पाहिले.
अवैध सावकारीविरोधात तक्रार करण्याचे आवाहन
उदगीर तालुक्यात विनापरवाना सावकारी करणाऱ्यांविरोधात माहिती असल्यास सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक (सावकारी) किंवा संबंधित तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि दोषींविरोधात कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आवाहन उदगीर येथील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एम. डी. कच्छवे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis