परभणीत अज्ञातांकडून लाखोंचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक
परभणी, 09 ऑक्टोबर (हिं.स.)। जिंतूर शहरातील पठाण मोहल्ला परिसरात टिनशेडच्या खोलीला आग लागून घरातील सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळ
अज्ञातांनी लाखोंचे संसारोपयोगी साहित्य दिले फुकून   -जिंतूरच्या पठाण मोहल्ल्यातील धक्कादायक घटना


परभणी, 09 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिंतूर शहरातील पठाण मोहल्ला परिसरात टिनशेडच्या खोलीला आग लागून घरातील सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेमुळे पठाण कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.पठाण मोहल्ला परिसरातील परवीनबी शामीर पठाण यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे घरातील सर्व साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी एका टिनशेडच्या खोलीत ठेवले होते. यामध्ये मुलींच्या लग्नासाठी आणून ठेवलेल्या साहित्याचाही समावेश होता. मात्र, शुक्रवारी दुपारी अचानक या खोलीला आग लागली. आगीमध्ये खोलीत ठेवलेले घरगुती साहित्य तसेच मुलींच्या लग्नासाठी आणलेले साहित्य जळून खाक झाले. या घटनेत सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शामीर पठाण हे रोजमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कष्टाने जमवलेले साहित्य आणि मुलींच्या लग्नासाठी आणून ठेवलेले साहित्य आगीत नष्ट झाल्याने पठाण कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आधीच मर्यादित उत्पन्नात संसाराचा गाडा चालवताना या घटनेमुळे कुटुंबाला आर्थिक फटका बसला आहे.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्याचे समजते. टिनशेडच्या खोलीला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत स्पष्टता नसली तरी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घ्यावा, तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पठाण कुटुंबीयांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande