
लातूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। राजर्षी शाहू महाराज सामाजिक दायित्व मंच, माटेफळ ता. जि. लातूर यांच्या वतीने बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, खुंटेफळ ता. जि. लातूर या संस्थेला आज ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष हर्षवर्धन राऊत व अण्णाराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
बळीराजा कृषि विज्ञान मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विशेषतः आदर्श गाव योजनेअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने केलेले कार्य, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती, कृषीविषयक मार्गदर्शन, ग्रामविकास आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम याची दखल घेऊन संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी काम करणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक उपक्रम राबविणे आणि ग्रामीण भागात विकासाची चळवळ निर्माण करणे, हा संस्थेच्या कार्याचा मुख्य उद्देश राहिला आहे.
या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला नवी प्रेरणा आणि बळ मिळाले असून, भविष्यातही सामाजिक व ग्राम विकासाच्या क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, उपाध्यक्ष विनायक शिंदे, सचिव पद्माकर भिसे, श्रीमंत खाडप तसेच संस्थेचे इतर सदस्य या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
पुरस्कार देऊन संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव केल्याबद्दल राजर्षी शाहू महाराज सामाजिक दायित्व मंच, माटेफळचे अध्यक्ष बापूसाहेब खोसे व सर्व पदाधिकाऱ्यांचे बळीराजा कृषी विज्ञान मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis