
लातूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लातूर–हडपसर (पुणे)–लातूर सुपरफास्ट दिवाळी विशेष रेल्वेची घोषणा केली आहे. गाडी क्रमांक ०१४२९ आणि ०१४३० या विशेष रेल्वेच्या प्रत्येकी चार फेऱ्या होणार असून, २ ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी ही गाडी धावणार आहे.
लातूरहून सकाळी ९.३० वाजता सुटणार
गाडी क्रमांक ०१४२९ लातूरहून सकाळी ९.३० वाजता सुटून दुपारी ३.३० वाजता हडपसर येथे पोहोचणार आहे. या प्रवासात हरंगूळ, मुरूड, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी, जेऊर आणि दौंड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या प्रवासासाठी ६ तास १० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
हडपसरहून दुपारी ४.०५ वाजता सुटणार
परतीची गाडी क्रमांक ०१४३० हडपसर येथून दुपारी ४.०५ वाजता सुटून रात्री ९.२० वाजता लातूरला पोहोचणार आहे. या गाडीलाही दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, मुरूड आणि हरंगूळ येथे थांबे असणार आहेत.
२४ डब्यांची रेल्वे
एकूण ३३१ किलोमीटर अंतर धावणाऱ्या या रेल्वेला २४ डबे असणार आहेत. यामध्ये एक एसी फर्स्ट क्लास, तीन एसी टू टियर, पाच एसी थ्री टियर, नऊ स्लीपर, चार जनरल आणि दोन एसएलआर डब्यांचा समावेश आहे.
दरम्यान, लातूर–हडपसर दिवाळी विशेष सुपरफास्ट रेल्वेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ही गाडी केवळ दिवाळीपुरती मर्यादित न ठेवता दिवाळीनंतरही कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगांवकर यांनी२६ सप्टेंबर ला पत्राद्वारे या गाडीची मागणी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis