वज्रेश्वरी महोत्सवांतर्गत ठाण्यात ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘दिवाळी फराळ व गृहोपयोगी वस्तूचे स्टॉल
ठाणे, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं सहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढविणे तसेच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्
वज्रेश्वरी महोत्सवांतर्गत ठाण्यात ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘दिवाळी फराळ व गृहोपयोगी वस्तूचे स्टॉल


ठाणे, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं सहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढविणे तसेच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने वज्रेश्वरी महोत्सवांतर्गत ‘दिवाळी फराळ व गृहोपयोगी वस्तू महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बी. जे. हायस्कूल आवार, टेंभीनाका, ठाणे (पश्चिम) येथे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात एकूण २५ स्वयं सहायता समूहांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

महिला स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करीत आहेत. त्यांच्या मेहनतीतून आणि कौशल्यातून तयार होणाऱ्या उत्पादनांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, महिला समूहांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि त्यांच्या कौशल्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले आहे.

महिला स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. या समूहांतील महिला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, दिवाळी फराळ तसेच गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन करतात. मात्र, त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन वज्रेश्वरी महोत्सवांतर्गत आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून समूहांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

या महोत्सवात सहभागी होणाऱ्या २५ स्वयं सहायता समूहांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांना महिला समूहांनी तयार केलेले फराळाचे पदार्थ आणि विविध गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासोबतच महिला समूहांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळणार आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी या महोत्सवाच्या अनुषंगाने माहिती देताना सांगितले की, महिला स्वयं सहायता समूहांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या विक्रीसाठी व्यासपीठ निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील २५ स्वयं सहायता समूहांचे स्टॉल या महोत्सवात सहभागी होणार असून, नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिला समूहांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande