
अमरावती, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। शहराच्या स्वच्छतेचा बोजवारा उडविणाऱ्या कोणार्क कंपनीवर महापालिका प्रशासनाची कृपादृष्टी कायम असल्याची चर्चा असतानाच, दिवाळीनिमित्त कंपनीकडून काही नगरसेवकांना दिलेल्या कथित भेटवस्तूंमुळे मनपा वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. मिठाईचा बॉक्स, पँटपीस, शर्टपीस आणि ११०० रुपयांचे पाकीट देऊन काही नगरसेवकांची मर्जी संपादन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोणार्क कंपनीचे उल्हासनगर येथील काही प्रतिनिधी अमरावतीत आले होते. त्यांच्या वाहनांसाठी महापालिका परिसरात सुरक्षित पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी महापालिका अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. आयुक्तांसोबत बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर या भेटीगाठींच्या चर्चेला अधिकच वेग आला.कंपनीकडून नगरसेवकांना दिवाळीच्या शुभेच्छांसह मिठाईचा बॉक्स, एक पँटपीस, एक शर्टपीस आणि ११०० रुपयांचे पाकीट दिल्याचे दावे केले जात आहेत. काही नगरसेवकांनी कोणतीही भेट स्वीकारली नसल्याचे सांगितले, तर काहींनी या प्रकरणावर मौन बाळगल्याची चर्चा आहे. या कथित भेटवस्तूंची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, शहरातील स्वच्छतेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, मोकळ्या भूखंडांवरील गाजरगवत, डासांचा वाढता प्रादुर्भाव, तुंबलेल्या नाल्या, दुर्गंधीयुक्त नाले आणि ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहेत. काही भागांत कचरा संकलनाच्या गाड्या पंधरा-पंधरा दिवस येत नसल्याच्या तक्रारी आहेत. करारातील अटींचे उल्लंघन आणि स्वच्छतेच्या कामातील कथित अनियमितता याबाबत कंपनीवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. शहराच्या स्वच्छतेपेक्षा दिवाळीच्या भेटवस्तूंनाच अधिक महत्त्व मिळाले का, असा बोचरा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.
---------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी