
पुणे, 01 नोव्हेंबर, (हिं.स.)। युवक-युवतींच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथील टी.सी. महाविद्यालयात ४ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, टी.सी. कॉलेज, बारामती आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य, कविता लेखन आणि विकसित भारत चॅलेंजअंतर्गत पीपीटी सादरीकरण अशा विविध स्पर्धा होणार आहेत. जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्यांना प्रावीण्य प्रमाणपत्र आणि बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. तसेच पीपीटी सादरीकरणातून सहा स्पर्धकांची राज्यस्तरीय सहभागासाठी निवड केली जाणार आहे.
या स्पर्धांमध्ये १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येईल. प्रवेश अर्जासोबत आधारकार्ड आणि जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. शाळेचे ओळखपत्र वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. याशिवाय प्रत्येक स्पर्धकाची ‘माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी असणे अनिवार्य आहे. VBYLD-२०२६ मधील सांस्कृतिक विभागात राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेले युवक यंदाच्या स्पर्धांसाठी पात्र नसतील.
इच्छुक स्पर्धकांनी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश अर्ज व्हॉट्सॲपद्वारे किंवा dsopune6@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी अश्विनी हत्तरगे (मो. ७३८७८८०४२७) किंवा सोमनाथ कदम (मो. ८८८८४६०४८६) यांच्याशी संपर्क साधावा. पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कला अकादमी आणि विविध संस्थांमधील इच्छुक कलाकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु