मेलानिया ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश; ओलेश्की शहरातून नागरिकांचे स्थलांतर सुरु
कीव, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनमधील ओलेश्की शहरातून उपासमार आणि आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचे स्थलांतर सुरूच आहे. या शहरात सहा दिवसांचा तात्पुरता युद्
मेलानिया ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश; ओलेश्की शहरातून नागरिकांचे स्थलांतर सुरु


कीव, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे रशियाच्या ताब्यात असलेल्या युक्रेनमधील ओलेश्की शहरातून उपासमार आणि आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचे स्थलांतर सुरूच आहे. या शहरात सहा दिवसांचा तात्पुरता युद्धविराम लागू करण्यात आला आहे. या काळात शहरात मदतसामग्रीचा पुरवठा केला जात असून, शहर सोडण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनाही बाहेर काढले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरात उरलेल्या दोन हजार नागरिकांपैकी बहुतांश जणांना आता तेथे राहायचे नाही. त्यामुळे ते शहर सोडून युक्रेनच्या मुक्त क्षेत्रात जात आहेत. अशा नागरिकांना प्रथम बसने क्रिमियामार्गे रशियातील अनापा शहरात आणले जात आहे. तेथून विमानाने त्यांना बेलारूसला पाठवले जात आहे. बेलारूसमधून हे नागरिक रस्तेमार्गे युक्रेनमध्ये दाखल होत आहेत.

ओलेश्की शहर सोडणाऱ्यांमध्ये बहुतांश वृद्ध, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून, अनेक दिवसांच्या हालअपेष्टांनंतर त्यांच्या मनात पुन्हा जगण्याची आशा निर्माण झाली आहे. बेलारूसमध्ये पोहोचलेल्या नागरिकांचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये अनेक आजारी वृद्धांना स्ट्रेचरवरून, तर काहींना व्हीलचेअरवरून आणल्याचे दिसत आहे. याशिवाय दोन पाळीव कुत्र्यांनाही पिंजऱ्यात ठेवून ओलेश्कीमधून बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, युक्रेनने रशियाच्या रोस्तोव्ह भागातील क्षेपणास्त्र निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या एका मोठ्या कारखान्यावर हल्ला करून त्याचे मोठे नुकसान केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात कारखान्यातील चार उत्पादन युनिट्सचे नुकसान झाले आहे.

अमेरिकेने शनिवारी युक्रेनसाठी २.१ अब्ज डॉलर किमतीच्या पॅट्रियट हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांच्या विक्रीला मंजुरी दिली. या व्यवहारासाठी कॅनडा, जर्मनी, नॉर्वे आणि युरोपीय महासंघातील अन्य देश आर्थिक मदत करणार आहेत. या निधीतून युक्रेनला ५०० क्षेपणास्त्रे पुरवली जाणार आहेत. मात्र, ही क्षेपणास्त्रे सध्या अमेरिकेकडे तयार स्थितीत उपलब्ध नाहीत.

सूत्रांच्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांचा पुरवठा होण्यासाठी चार वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. उल्लेखनीय म्हणजे, रशियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी युक्रेनला गेल्या अनेक महिन्यांपासून पॅट्रियट हवाई संरक्षण यंत्रणेसाठी क्षेपणास्त्रांची आवश्यकता आहे. मात्र, इराण युद्धात गुंतलेल्या अमेरिकेकडून या क्षेपणास्त्रांचा पुरवठा होत नव्हता.

अमेरिका आता युक्रेनला मोफत शस्त्रास्त्रे पुरवत नसून, त्यांच्याकडून पैसे घेऊन शस्त्रविक्री करत आहे. युक्रेनसाठी या शस्त्रास्त्रांचा खर्च युरोपीय देश, कॅनडा आणि अन्य मित्रदेश उचलत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande