
पॅरिस, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।फ्रान्समध्ये वाढती महागाई आणि शैक्षणिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र झाले आहे. सलग तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी होणारी आंदोलने लक्षात घेता सरकारने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. आंदोलनादरम्यान हिंसाचार आणि अशांतता निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन फ्रान्समध्ये सुमारे ७० हजार पोलीस आणि सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. विशेषतः हॅलोविनच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राजधानी पॅरिसमध्ये होणाऱ्या मोर्चाचा मार्ग बदलून शहराच्या बाहेरील भागाकडे वळवण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या कामगार संघटना आणि ‘यलो व्हेस्ट’ आंदोलकांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आता आंदोलकांना पोर्ट डी बॅग्नोले ते पोर्ट डी शारेंटन या निश्चित मार्गावरूनच मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.दरम्यान, फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेझ यांनी हॅलोविनच्या दिवशी, विशेषतः अंधार पडल्यानंतर अशांतता निर्माण होण्याचा मोठा धोका असल्याचा इशारा दिला आहे. कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटनांनी आंदोलनावर लादण्यात आलेल्या निर्बंधांना न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही.
पोलिसांनी पॅरिसमधील प्लास द ला रिपब्लिक आणि लेस हॉल्स या भागांतही नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. या दोन्ही ठिकाणी १७ ऑक्टोबर रोजी दंगल आणि लुटमारीच्या घटना घडल्या होत्या. ही बंदी शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.फ्रान्ससोबतच जर्मनी आणि स्पेनमध्येही तरुणांच्या नेतृत्वाखाली आंदोलनांची तयारी सुरू आहे.
जर्मनीतील ‘जेन झेड रेगेल्ट’ या युवा संघटनेने देशातील सुमारे ३० शहरांमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. शिक्षण, आरोग्य, हवामान संरक्षण आणि परवडणाऱ्या जीवनमानाच्या मागण्या मांडणे हा या आंदोलनांचा मुख्य उद्देश आहे. बर्लिनमधील ब्रँडेनबर्ग गेट येथे सुमारे १० हजार लोक जमण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे, स्पेनमधील बार्सिलोना येथेही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दंगलीनंतर सुमारे १३० जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये होणारी आंदोलने लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, फ्रान्समध्ये वाढत्या महागाईच्या विरोधात मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात सातत्याने आंदोलने सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्यांमधून सुरू झालेल्या या आंदोलनाचा विस्तार आता संपूर्ण देशभर झाला आहे. राजधानी पॅरिससह फ्रान्समधील विविध शहरांमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode