
अमरावती, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीच्या तोंडावर मुंबई-अमरावती-मुंबई या मार्गावरील विमान तिकीट दरांत वाढ झाली आहे. लक्ष्मीपूजनानंतर येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावरील विमान तिकीट दरांत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अमरावती ते मुंबई रेल्वे प्रवासाला १२ तासांचा अवधी लागतो. विमानाद्वारे १ तास ४५ मिनिटांत पोहचता येते. त्यामुळे विमान सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असताना दिवाळी सणादरम्यान प्रवास महागल्याने प्रवाशांची निराशा झाली आहे.
२३०० रुपयांवरून थेट ८ हजारांवर
अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे किमान भाडे हे २३१० रूपये इतके आहे. लक्ष्मीपूजन ८ नोव्हेंबरला आहे. ९ नोव्हेंबरपासून तिकीट दरांत वाढ झाल्याचे दिसून येते. ९ तारखेला मुंबईहून अमरावतीला येण्यासाठी ८ हजार ६१० रुपये सुपर सेव्हर या श्रेणीतील तिकिटासाठी मोजावे लागत आहेत. व्हॅल्यू या श्रेणीतील भाडे १०५०० तर फ्लेक्झिबल श्रेणीचे भाडे १७८५० रुपये आहे. ११ नोव्हेंबरला देखील हेच दर आहेत. १३ नोव्हेंबरपासून तिकिटांचे दर ४ हजार ८२ रुपयांपर्यंत खाली आले असले, तरी मागणी वाढल्यास या तिकीट दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
अमरावती ते मुंबई प्रवासही ८ हजारांवर
दिवाळी सुट्ट्यांनंतर परत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहे. ११ नोव्हेंबरला तिकिटाचे किमान दर ८ हजार ६१० रुपये आहेत. १३ नोव्हेंबरपासून तर सुपर सेव्हर श्रेणीतील तिकीटच उपलब्ध नाही. त्यामुळे व्हॅल्यू आणि फ्लेक्झिबल श्रेणीतील तिकिटांसाठी १० हजार ५०० ते १७ हजार ८५० रुपये मोजावे लागत आहेत.
आठवड्यातून चार दिवस सेवा
मुंबई-अमरावती-मुंबई ही अलायन्स एअर कंपनीची विमानसेवा दर रविवार, सोमवारी, बुधवार आणि शुक्रवार असे चार दिवस आहे. अमरावती विमानतळावर ‘डीव्हीओआर-डीएमई’ही अत्याधुनिक प्रणाली बसविण्यात आली आहे. याची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. त्यामुळे अनेक तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे अमरावती-मुंबई ही विमानसेवा दररोज सुरू करावी आणि पुणे-अमरावती-पुणे नियमित विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी