टोरंटच्या प्रकल्पाविरोधात कर्जतकर एकवटले; उद्या तालुका बंद
रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्प आणि त्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात सोमवारी (२ नोव्हेंबर) कर्जत तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. साय डोंगरातील जंगल आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्
बंद


रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्प आणि त्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात सोमवारी (२ नोव्हेंबर) कर्जत तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. साय डोंगरातील जंगल आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना एकवटल्या आहेत.

प्रस्तावित प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येण्याची भीती आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वृक्षतोड थांबवावी आणि प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांचा सखोल विचार करावा, अशी मागणी पुढे आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत बंदचे आवाहन केले आहे.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर कर्जत रेल्वे स्थानक परिसरासह शहरातील विविध ठिकाणी आवाहन करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. साय डोंगरातील जंगल वाचविण्यासाठी कर्जतकरांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बंदला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. बंदच्या माध्यमातून टोरंट पॉवर प्रकल्प आणि जंगलतोडीविरोधातील जनभावना सरकारपर्यंत पोहोचविण्याचा आंदोलकांचा प्रयत्न आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande