
रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ईश्वर्जुन फाउंडेशन, कल्याण आणि कर्जत प्रेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील नांगुर्ले आदिवासी वाडीत कातकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमात आदिवासी महिला, पुरुष आणि लहान मुलांना कपडे, दिवाळी फराळ, मिठाई, फटाके, बेडशीट आणि विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. अपघातामुळे अपंगत्व आलेल्या समीर वाघमारे याला व्हीलचेअर प्रदान करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर साहित्यवाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करत ग्रामस्थांनी दिवाळीचा आनंद घेतला. या उपक्रमामुळे वाडीतील मुलांच्या आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
आदिवासी बांधवांनाही दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, या भावनेतून दोन्ही संस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी ईश्वर्जुन फाउंडेशनच्या अध्यक्षा माधुरी बुधरानी, हरेश बुधरानी, मनीका माटा, दृष्टि माटा, ॲड. हितेश जेसवानी, प्रा. भारत खत्री, प्रा. सोनी नरवानी, प्रा. लवीना मंगतानी, करुणा मेवलानी यांच्यासह कर्जत प्रेस असोसिएशनचे सल्लागार दीपक बोराडे, किशोर गायकवाड, भूषण प्रधान, अध्यक्ष कैलास म्हामले, कार्याध्यक्ष संदेश साळुंके, सचिव रामदास माळी, उपाध्यक्ष महेश भगत, सहखजिनदार नरेश कोळंबे, सदस्य प्रथमेश कुडेकर आणि गणेश लोट उपस्थित होते. तसेच नंदकुमार धामणसे, पारस कदम, चंद्रकांत पवार, अविनाश म्हामले आणि आदिवासी वाडीतील ग्रामस्थ सहभागी झाले.
या उपक्रमातून दिवाळीच्या आनंदासोबतच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि वंचित घटकांप्रती संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)