टोरंट प्रकल्पाला विरोध नाही; पण झाडे जगवण्याची जबाबदारी कंपनीचीच! पाच वर्षांच्या संगोपनाची किरण ठाकरे यांची मागणी
रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। टोरंट प्रकल्पावरून कर्जतमध्ये पर्यावरण विरुद्ध विकास असा संघर्ष उभा राहिला असताना भाजप नेते किरण ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका नसली, तरी विकासाच्या नावाखाली जंगल
Kiran thakare


रायगड, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।

टोरंट प्रकल्पावरून कर्जतमध्ये पर्यावरण विरुद्ध विकास असा संघर्ष उभा राहिला असताना भाजप नेते किरण ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका नसली, तरी विकासाच्या नावाखाली जंगलाचा बळी देणे योग्य नाही. प्रकल्पही झाला पाहिजे आणि निसर्गही टिकला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, वृक्षतोड आणि स्थानिकांच्या प्रश्नांवर सरकारने अधिक संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रकल्पासाठी तोडण्यात येणारी झाडे केवळ दुसरीकडे लावून शासन आणि कंपनीने जबाबदारी झटकू नये. झाडांचे पुनर्रोपण केल्यानंतर किमान पाच वर्षे त्यांचे संगोपन, पाणीपुरवठा, औषधोपचार आणि संरक्षण करण्याची जबाबदारी कंपनीवर बंधनकारक करावी. झाडे जगवूनच ती शासनाकडे हस्तांतरित करण्याची अट घालावी, अशी ठाम मागणी ठाकरे यांनी केली. चीनमध्ये वृक्षांचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण आणि संगोपन होत असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.

वीजनिर्मिती आणि पाण्याबाबत ठाकरे यांचे दावे

टोरंट प्रकल्पातून सुमारे तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून त्याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरी आणि उद्योगांना मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. प्रकल्पात पावसाचे पाणी साठवणे आणि त्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था असल्याने कर्जतच्या पाण्यावर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या दाव्यांची स्वतंत्र तांत्रिक पडताळणी झालेली नाही.

वनविभागावर दिरंगाईचा आरोप; स्थानिकांच्या प्रश्नांवर पाठपुराव्याचे आश्वासन

वनविभागाच्या जाचक अटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील समन्वयाच्या अभावामुळे विकासकामे रखडत असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला, स्थानिकांना रोजगार आणि नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली.

प्रकल्पाला समर्थन देताना पर्यावरणीय प्रश्न आणि स्थानिकांचा विरोध दुर्लक्षित करता येणार नाही, हे ठाकरे यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी या प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करून विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande