विकसित भारताच्या संकल्पात विवेकानंद छात्रवासाचा महत्त्वपूर्ण हातभार - खा. डॉ. अनिल बोंडे
अमरावती, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून समृद्ध आणि बलशाली भारताचे स्वप्न साकार होत आहे. तरुण घडला, तरच सशक्त आणि बलशाली राष्ट्र निर्माण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ''विकसित भारत'' संकल्पाला प्रज्ञा प्
विकसित भारताच्या संकल्पात विवेकानंद छात्रवासाचा  महत्त्वपूर्ण हातभार  खासदार डॉ. अनिल बोंडे


अमरावती, 01 नोव्हेंबर (हिं.स.)। स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून समृद्ध आणि बलशाली भारताचे स्वप्न साकार होत आहे. तरुण घडला, तरच सशक्त आणि बलशाली राष्ट्र निर्माण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या 'विकसित भारत' संकल्पाला प्रज्ञा प्रबोधिनी संचालित विवेकानंद छात्रवासाच्या माध्यमातून मोठा हातभार लागत आहे, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.

पारधी समाजातील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विवेकानंद छात्रवासातर्फे एक उत्कृष्ट निवासी प्रकल्प चालवला जात आहे. या प्रकल्पात सध्या २५ मुले निवासी शिक्षण घेत आहेत. खा. डॉ. अनिल बोंडे यांनी या छात्रवासाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत, त्यांच्यातील राष्ट्रप्रेमाची आणि तंत्रज्ञानाची आवड पाहून त्यांनी बालकांचे कौतुक केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भगवद्गीतेतील अध्याय श्लोक याचे सादरीकरण केले. हे सादरीकरण पाहून खासदार डॉ.अनिल बोंडे भारवून गेले. आजच्या आधुनिक युगात वंचित घटकातील मुले तंत्रज्ञानापासून दूर राहू नयेत, त्यांनी राष्ट्राच्या उभारणीत तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनून योगदान द्यावे, या उद्देशाने खा. डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी मोठी घोषणा केली. विवेकानंद छात्रवासात अद्ययावत 'संगणक लॅब' विकसित करण्यासाठी आपल्या खासदार निधीतून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

स्वामी विवेकानंदांच्या राष्ट्रनिर्माणाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम प्रज्ञा प्रबोधिनी संस्था करत आहे. वंचित आणि उपेक्षित पारधी समाजातील बालकांना केवळ शिक्षण न देता, त्यांच्यात संस्कार आणि 'राष्ट्र प्रथम' ही भावना रुजवण्याचे पवित्र कार्य या निवासी प्रकल्पातून घडत असल्याचे मत खा. अनिल बोंडे यांनी यावेळी व्यक्त केले. या प्रसंगी प्रज्ञा प्रबोधिनीचे अध्यक्ष अविनाश देशपांडे, उपाध्यक्ष प्रवीण जोशी, सचिव मुकुंद देशपांडे यांच्यासह संस्थेचे इतर पदाधिकारी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande