
नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर (हिं.स.)नवी दिल्ली येथे आयोजित ४७ व्या जागतिक आर्मरेसलिंग आणि २८ व्या जागतिक पॅरा आर्मरेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये, सहभागी ६५ देशांपैकी भारताने एकूण पाचवे स्थान पटकावले आहे. मायदेशातील प्रेक्षकांसमोर मिळवलेले हे एक ऐतिहासिक यश आहे.
'पीपल्स आर्मरेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया' (PAFI) आणि 'प्रो पंजा लीग'ने दोन उद्दिष्टे ठेवली होती. २०२६ पर्यंत पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळवणे आणि तीन वर्षांच्या आत पहिल्या पाच देशांमध्ये येणे. भारताने नियोजित वेळेच्या तीन वर्षे आधीच पहिल्या पाच देशांमध्ये स्थान मिळवले आहे.
भारतीय संघाने एकूण ५९ पदके (९ सुवर्ण, १९ रौप्य आणि ३१ कांस्य) जिंकली, ज्यामध्ये सर्व वयोगटांतील आणि विभागांतील खेळाडूंचे योगदान होते. पॅरा खेळाडूंनी सर्वाधिक २६ पदके (२ सुवर्ण, १० रौप्य, १४ कांस्य) मिळवून दिली, ज्यामुळे पॅरा प्रकारातील क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर राहिला. सब-ज्युनिअर, ज्युनिअर आणि युथ गटातील खेळाडूंनी २० पदके (३ सुवर्ण, ८ रौप्य, ९ कांस्य) जिंकली, तर मास्टर्स आणि ग्रँड मास्टर्स गटात १२ पदके (४ सुवर्ण, १ रौप्य, ७ कांस्य) मिळाली. वरिष्ठ (सीनिअर) गटात भारताला १ कांस्य पदक मिळाले.
जिन्सीमोल सेबॅस्टियनने 'ग्रँड मास्टर महिला ८० किलो' गटात दोन्ही सुवर्णपदके जिंकली. योगेश चौधरी आणि शौकत व्ही.टी. यांनी आपापल्या गटात सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावले. मधुरा के.एन. ने 'सीनिअर महिला ७० किलो' गटात कांस्य पदक जिंकले.
प्रीती झंगियानी आणि परवीन डबास यांनी 'प्रो पंजा लीग'ची स्थापना केली, ज्याचा उद्देश भारतातील आर्मरेसलिंग खेळाला व्यावसायिक स्वरूप देणे आणि तळागाळातील स्पर्धांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत एक सुव्यवस्थित मार्ग तयार करणे हा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे