
रत्नागिरी, 10 नोव्हेंबर (हिं.स.) । विक्रीच्या उद्देशाने ब्राऊन हेरॉईनसदृश अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी साखरी नाटे (ता. राजापूर) येथील २१ वर्षीय तरुणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहाथ ताब्यात घेतले. ही रत्नागिरीत ‘ऑल आऊट’ ऑपरेशनअंतर्गत नाकेबंदी सुरू असताना करण्यात आली.
पोलिसांच्या गस्ती पथकाला नुफेरअली खालिद तांडेल (२१, रा. गाजी मोहल्ला, वरचा वाडा, साखरी नाटे, ता. राजापूर) हा तरुण संशयास्पदरीत्या आढळून आला. त्याची तपासणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये उग्र वासाचा ब्राऊन हेरॉईनसदृश अमली पदार्थ आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिक पिशवीसह त्याचे वजन सुमारे सहा ग्रॅम असून निव्वळ वजन चार ग्रॅम आहे. हा पदार्थ सुमारे १२० पुड्यांमध्ये विभागण्यासाठी तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत निदर्शनास आले.
या कारवाईत अंदाजे ६० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ, पुड्या बांधण्याचे १२० कागदी तुकडे, सुमारे ५ हजार रुपये किमतीचा रियलमी कंपनीचा मोबाइल फोन तसेच सुमारे १ लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची अॅक्सेस दुचाकी असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी