नंदुरबारमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याची उकल; २० लाख ५८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या
नंदुरबार, 09 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील पुष्पा विनोदकुमार चिंतलागे, रा. प्लॉट नं. १०, अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ, गणेशनगर, नंदुरबार यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात अनधिकृत प्रवेश करून एकूण १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागि
नंदुरबारमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याची उकल; २० लाख ५८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या


नंदुरबार, 09 नोव्हेंबर (हिं.स.) शहरातील पुष्पा विनोदकुमार चिंतलागे, रा. प्लॉट नं. १०, अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ, गणेशनगर, नंदुरबार यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात अनधिकृत प्रवेश करून एकूण १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यावरून नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ८९८/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे दिनांक ०५/११/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार मार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक ०७/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, २ ते ३ दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील लालबाग कॉलनी परिसरात झालेली घरफोडी ही होळ तर्फे हवेली शिवारात राहणारा आकाश सोनार व त्याचा साथीदार रोहित मोरे यांनी मिळून केलेली असून ते त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कारने सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी होळ तर्फे हवेली येथून धुळे चौफुलीकडे जाणार आहेत. खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती कळवून बातमीची खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील जगतापवाडी चौफुली येथे नाकाबंदी लावून रात्री ३.०५ वाजेच्या सुमारास करण चौफुलीकडून जगतापवाडी चौफुलीकडे येणारे एक चारचाकी वाहन दिसले. पथकातील अंमलदारांनी हातातील टॉर्चच्या सहाय्याने पंचासमक्ष सदर वाहन थांबविले. सदर वाहनाजवळ जाऊन पाहिले असता पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार क्रमांक जीजे ०५ जेबी ७७८८ असल्याचे दिसून आले. वाहनातील इसमांना पंचासमक्ष त्यांचे नाव-गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) आकाश भिका सोनार, वय २७ वर्षे, रा. ओम साई पार्क, होळ शिवार, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार २) रोहित किशोर मोरे, वय २१ वर्षे, रा. वाठोडा, ता. शिरपूर, जि. धुळे, ह.मु. शांतीनगर, लिंबायत, सुरत, गुजरात राज्य असे असल्याचे सांगितले.

मिळालेल्या गोपनीय बातमीतील संशयित इसमांच्या नावाची खात्री झाल्याने पंचासमक्ष पांढऱ्या रंगाच्या होंडा सिटी कारची पाहणी केली असता सदर वाहनाच्या ग्लोव्ह बॉक्समध्ये एका लाल रंगाच्या पिशवीमध्ये १४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. त्यानंतर वरील मुद्देमालाबाबत दोन्ही संशयित इसमांना पंचासमक्ष विचारपूस केली असता त्यापैकी आकाश भिका सोनार याने सांगितले की, तो व त्याचा मित्र रोहित मोरे व त्यांचा आणखी एक साथीदार यांनी मिळून २ ते ३ दिवसांपूर्वी नंदुरबार शहरातील लालबाग कॉलनी परिसरात सायंकाळच्या सुमारास एका बंद घराचे कुलूप तोडून सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. त्याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ८९८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील घरफोडी करून चोरीस गेलेला माल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर १४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ६ लाख रुपये किमतीचे गुन्ह्यासाठी वापरलेले पांढऱ्या रंगाचे होंडा सिटी चारचाकी वाहन असा एकूण २० लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून गुन्ह्याच्या पुढील तपासकामी जप्त करण्यात आला असून आरोपी व जप्त मुद्देमाल नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, मुकेश तावडे, योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, हेमंत बारी, मनोज महाजन, विनोद पाटील, महिला पोलीस अंमलदार रोहिणी धनगर यांच्या पथकाने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande