नेतान्याहू एक मिनिटही सत्तेत राहण्यास पात्र नाहीत; आयझेनकोट यांची लिकुडसोबतची बैठक रद्द
जेरुसलेम, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। इस्रायलच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, गादी आयझेनकोट यांच्या ‘याशार’ पक्षाने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या ‘लिकु
नेतान्याहू एक मिनिटही सत्तेत राहण्यास पात्र नाहीत; आयझेनकोट यांची लिकुडसोबतची बैठक रद्द


जेरुसलेम, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। इस्रायलच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, गादी आयझेनकोट यांच्या ‘याशार’ पक्षाने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या ‘लिकुड’ पक्षासोबत आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी नियोजित केलेली बैठक रद्द केली आहे. इस्रायलच्या नवनिर्वाचित नेसेट (संसद)च्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नेतान्याहू यांनी केलेल्या भाषणानंतर हा निर्णय घेण्यात आला.

आयझेनकोट यांनी नेतान्याहू यांच्या भाषणाचे वर्णन ‘भ्रम निर्माण करणारे, फूट पाडणारे, द्वेषपूर्ण आणि लज्जास्पद’ असे केले.विशेष म्हणजे, याच्या एक दिवस आधीच नेतान्याहू यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘राष्ट्रीय एकता सरकार’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. इराणच्या अण्वस्त्रविषयक धोक्याचा सामना करण्यासाठी इस्रायलने एकजूट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.मंगळवारी संसदेत केलेल्या भाषणात नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा हे आवाहन केले. मात्र, अरबबहुल पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याचा विचार करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर त्यांनी टीकाही केली. नेतान्याहू यांच्या वक्तव्यांमुळे ते पंतप्रधानपदावर राहण्यास पात्र नसल्याचा आपला विश्वास अधिक दृढ झाल्याचे आयझेनकोट यांनी सांगितले.

आयझेनकोट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “मी विद्यमान पंतप्रधानांचे भ्रम निर्माण करणारे, फूट पाडणारे, द्वेषपूर्ण आणि लज्जास्पद भाषण ऐकले. २६व्या नेसेटच्या शपथविधीसारख्या महत्त्वाच्या राजकीय सोहळ्याचा त्यांनी गैरवापर केला. आता ते या पदावर एक मिनिटही राहण्यास पात्र नाहीत, याची मला पूर्ण खात्री झाली आहे.”ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय आणीबाणीचे सरकार स्थापन करण्यासाठी आपण तातडीने पावले उचलली पाहिजेत. नेतान्याहू यांचे सातत्याने सुरू असलेले सत्तेतील अस्तित्व इस्रायलमध्ये फूट पाडत असून, देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करत आहे.”यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते यायर लापिड, यायर गोलान, अविग्दोर लिबरमन आणि नफ्ताली बेनेट यांना पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.

दरम्यान, याशार पक्षाने लिकुडसोबतची बैठक रद्द केली आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखालील याशार पक्षाचे चर्चापथक बुधवारी लिकुडच्या प्रतिनिधींना भेटणार होते. पक्षाने यासंदर्भात निवेदन जारी केले.निवेदनात म्हटले आहे की, “सरकार स्थापनेसाठी याशार पक्षाने निश्चित केलेल्या चार तत्त्वांच्या आधारे नेसेटमधील सर्व पक्षांशी प्रामाणिकपणे चर्चा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, आयझेनकोट यांच्या पथकाची लिकुडच्या प्रतिनिधींसोबत बुधवारी बैठक निश्चित करण्यात आली होती.”मात्र, नेसेटच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान नेतान्याहू यांनी केलेले भाषण आणि त्यांची वर्तणूक पाहता, आयझेनकोट यांनी आपल्या पथकाला ही बैठक रद्द करण्याचे निर्देश दिले, असे पक्षाने स्पष्ट केले.

याशार पक्षाने नेतान्याहू यांच्यावर राष्ट्रीय एकतेपेक्षा स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. त्यांचे भाषण हे इस्रायली नागरिकांना एकत्र आणण्याची त्यांची इच्छा नसल्याचे आणखी एक उदाहरण असल्याचेही पक्षाने म्हटले आहे. दुसरीकडे, नेतान्याहू यांनी संयुक्त सरकार स्थापन करण्याचा आग्रह कायम ठेवला आहे. इस्रायलसमोरील सुरक्षा आव्हाने लक्षात घेता विरोधी पक्षांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवावेत, असे त्यांचे म्हणणे आहे.आपल्या भाषणादरम्यान त्यांनी ज्यू विरोधी पक्षनेते सरकार स्थापन करण्यासाठी अरब राजकारण्यांवर अवलंबून राहण्यास तयार आहेत का, असा सवाल उपस्थित केला.

नव्या नेसेटचे कामकाज सुरू झाले असताना आयझेनकोट सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांत गुंतले आहेत. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसहाक हर्झोग यांनी पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आयझेनकोट यांना संधी दिल्यानंतर ते आघाडी उभारण्याच्या कामाला लागले आहेत.त्यांच्या गटाला ६७ खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. यामध्ये ‘राआम’ आणि ‘जॉइंट लिस्ट’ या पक्षांचाही समावेश आहे.

निवडणुकीनंतर १२० सदस्यांच्या नेसेटमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखालील ‘लिकुड’ पक्षाला ५३ जागा मिळाल्या, तर आयझेनकोट यांच्या ‘याशार’ आघाडीने ४८ जागा जिंकल्या. सरकार स्थापन करण्यासाठी किमान ६१ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.आयझेनकोट यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आल्यास इस्रायलचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेतान्याहू यांची कारकीर्द संपुष्टात येईल. मात्र, आयझेनकोट यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यास राष्ट्राध्यक्ष हर्झोग नेतान्याहू यांना पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी देतील, अशी शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande