
वॉशिंग्टन, 11 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रयत्न मंगळवारी प्रतिनिधीगृहात अयशस्वी ठरला. रिपब्लिकन सदस्यांनी २११ विरुद्ध २०४ अशा मतांनी हा प्रस्ताव न्यायिक समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाभियोगाच्या आठ आरोपांवर थेट मतदान करण्याची प्रक्रिया थांबली.
केंटकीचे रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी यांनी हा प्रस्ताव मांडला होता. मॅसी यांनी हेगसेथ यांच्यावर काँग्रेसची परवानगी न घेता इराणविरोधात युद्ध सुरू केल्याचा, नागरिकांच्या जीवितहानीला आळा घालण्यासाठी असलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि इतर गंभीर आरोप केले होते. हा प्रस्ताव पुढे नेण्याच्या बाजूने मतदान करणारे मॅसी हे एकमेव रिपब्लिकन खासदार होते.
या प्रक्रियात्मक मतदानानंतर सध्याच्या काँग्रेसमध्ये हेगसेथ यांच्याविरोधातील महाभियोगाची प्रक्रिया प्रभावीपणे ठप्प झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत केले. डेमोक्रॅट्सचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले.मतदानापूर्वी हेगसेथ यांनी पेंटागॉनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाभियोगाच्या प्रयत्नाला राजकीय तमाशा आणि निव्वळ फार्स असे संबोधले. तसेच अमेरिकन सैन्याविरोधात अशा प्रकारचे आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी डेमोक्रॅट्सना प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळाल्यास हेगसेथ यांच्याविरोधात पुन्हा कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हेगसेथ यांची पाठराखण केली. ते म्हणाले, आम्ही इस्रायल आणि पश्चिम आशियाचे संरक्षण केले. जर आम्ही त्यांना इराणपासून वाचवले नसते, तर इस्रायलचे अस्तित्वच राहिले नसते. महाभियोगाची मागणी फेटाळण्याच्या निर्णयावर बोलताना ट्रम्प म्हणाले, आणि आता युद्धासाठी सर्वाधिक जबाबदार असलेल्या व्यक्तींपैकी एकासोबत आपण काय करणार आहोत? आपल्याला त्यांच्यावर महाभियोग चालवायचा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode