
अबू धाबी , 11 नोव्हेंबर (हिं.स.)।संपूर्ण जगाचे लक्ष सध्या संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) केंद्रित झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी यूएईमध्ये युक्रेन, रशिया आणि अमेरिका यांच्यातील दोन दिवसीय त्रिपक्षीय चर्चेला सुरुवात झाली आहे. अबू धाबी येथे पहिल्या दिवशी सुमारे साडेचार तास चर्चा झाली. यावेळी युद्धविराम, युक्रेनच्या सुरक्षेची हमी आणि प्रादेशिक सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीत रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सल्लागार व्लादिमीर मेडिन्स्की करत आहेत. तर अमेरिकेच्या वतीने स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर मध्यस्थीची जबाबदारी सांभाळत आहेत. या त्रिपक्षीय बैठकीत कोणत्याही युरोपीय देशाचा प्रतिनिधी सहभागी झालेला नाही. मात्र, फ्रान्स, जर्मनी आणि नाटोचे प्रतिनिधी युक्रेनच्या शिष्टमंडळासोबत स्वतंत्र बैठक घेण्यासाठी अबू धाबीमध्ये उपस्थित आहेत.
बैठकीपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देश युद्धाला कंटाळले असून त्यांना आता युद्धविराम हवा असल्याचे म्हटले. ट्रम्प म्हणाले, मी युक्रेन आणि रशियाला एकत्र आणण्यात यशस्वी होऊ शकतो. सध्या आमची बैठक सुरू आहे. हे युद्ध एक देश म्हणून अमेरिकेला प्रभावित करत नाही; मात्र या युद्धात दर महिन्याला २५ हजार लोकांचा मृत्यू होत आहे. ही बाब मला अस्वस्थ करते.यूएईमध्ये सुरू असलेली ही बैठक गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
दुसरीकडे, यूएईमधील चर्चेपूर्वी रशियाने युद्धविरामाची मागणी फेटाळून लावली आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी स्पष्ट केले की, भविष्यात काय घडणार आहे, हे माहीत नसताना रशिया तातडीने युद्धविरामास सहमती देऊ शकत नाही.चर्चेच्या अजेंड्यावर सामूहिक सुरक्षा तसेच रशिया, युक्रेन आणि संपूर्ण क्षेत्राच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या प्रस्तावाचे लावरोव्ह यांनी स्वागत केले. मॉस्कोला ट्रम्प प्रशासनाबाबत कोणताही भ्रम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, संघर्ष करण्यापेक्षा चर्चा करणे हा नेहमीच चांगला पर्याय असल्याचे ते म्हणाले.सर्गेई लावरोव्ह म्हणाले, अमेरिकेसोबत चर्चा करण्याचा आम्हाला मोठा अनुभव आहे. अबू धाबीमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या चर्चेत हा अनुभव उपयुक्त ठरेल, अशी मला आशा आहे. व्यापक करार झाल्यानंतरच प्रभावी ठरणाऱ्या प्रादेशिक सुरक्षा व्यवस्थेबाबत दोन्ही पक्ष चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
युद्ध संपवण्याच्या मुद्द्यावर रशिया आणि युक्रेन यांच्या भूमिकांमध्ये मोठी तफावत असल्याचेही दिसून येत आहे. पुतिन यांची मागणी आहे की, युक्रेनने दोनेत्स्क, लुहान्स्क, झापोरिझिया आणि खेरसॉन या भागांतून आपले सैन्य मागे घ्यावे. सप्टेंबर २०२२ मध्ये रशियाने हे चार प्रदेश बेकायदेशीररीत्या आपल्या देशात विलीन केले होते. मात्र, रशियाला अद्याप या संपूर्ण प्रदेशांवर पूर्णपणे ताबा मिळवता आलेला नाही.
याशिवाय, युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न सोडावा, आपल्या सैन्यावर कठोर निर्बंध स्वीकारावेत तसेच देशातील रशियन भाषेवरील आणि मॉस्कोशी संबंधित 'ऑर्थोडॉक्स चर्च'वरील निर्बंध हटवावेत, अशा मागण्याही रशियाने केल्या आहेत. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्या मागण्या फेटाळून लावल्या आहेत. युद्धादरम्यान रशियाला ज्या प्रदेशांवर कब्जा करता आलेला नाही, असे प्रदेश युक्रेनने स्वेच्छेने सोडावेत, ही मागणी मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode