
तेहरान, 11 नोव्हेंबर (हिं.स.)।इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने मंगळवारी दावा केला की, होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन तेलवाहू जहाजांना आग लागली आहे. याच भागात इराणकडून अनेकदा आपल्या परवानगीशिवाय प्रवास करणाऱ्या जहाजांना लक्ष्य केले जाते. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) सरकारी तेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आखाती क्षेत्रातील यूएईच्या सागरी हद्दीत त्यांच्या एका जहाजावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजाचे नुकसान झाले आहे.
ब्रिटिश सागरी सुरक्षा संस्था ‘यूकेएमटीओ’नेही ओमानच्या किनाऱ्याजवळ, होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका तेलवाहू जहाजावर अज्ञात हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, या घटना इराणने उल्लेख केलेल्या जहाजांशी संबंधित आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.फेब्रुवारीच्या अखेरीस मध्यपूर्वेत तणाव सुरू झाल्यापासून इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीवर कठोर निर्बंध लादले आहेत. केवळ इराणने अधिकृत केलेल्या सागरी मार्गांचाच वापर जहाजांनी करावा, अशी भूमिका इराणने घेतली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणच्या बंदरांवर नौदलाची नाकेबंदी केली असून, तेलवाहू जहाजांना या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यासाठी मदत केली जात आहे.जगभरातील एकूण तेल वाहतुकीपैकी सुमारे पाचवा हिस्सा याच सागरी मार्गातून होतो.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत परवानगीशिवाय मार्गाचा वापर करणाऱ्या दोन तेलवाहू जहाजांवर जोरदार स्फोट झाले. त्यानंतर ही जहाजे थांबली असून, त्यांना आग लागली आहे. ’गार्ड्सने पुढे सांगितले की, ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीत परवानगीशिवाय प्रवास करणारे तिसरे तेलवाहू जहाज मंगळवारी दुपारी समुद्रातील सुरुंगाला धडकल्याने त्यात स्फोट झाला.’मात्र, या जहाजांची नावे किंवा ती कोणत्या देशातून आली होती, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
अलीकडच्या काही आठवड्यांत इराणने या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या अनेक जहाजांना आग लागल्याचे दावे वारंवार केले आहेत. काही जहाजे समुद्रातील सुरुंगांना धडकल्याने त्यांचे नुकसान झाल्याचेही इराणचे म्हणणे आहे. मात्र, अमेरिकन लष्कराने अलीकडेच या सागरी मार्गावरील सर्व सुरुंग हटवण्यात आल्याचा दावा केला होता.या भागातील अमेरिकेच्या लष्करी मोहिमांवर देखरेख करणाऱ्या ‘यूएस सेंट्रल कमांड’ने गेल्या महिन्यात दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यापासून आखाती देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून १.५ अब्ज बॅरल तेलाची निर्यात करण्यासाठी अमेरिकेने मदत केली आहे.
मंगळवारी गार्ड्सने सांगितले की, एका महाकाय तेलवाहू जहाजाची समुद्रातील नौदलाच्या सुरुंगाला धडक बसल्याने त्यात स्फोट झाला. तसेच, अमेरिकन लष्कराच्या संरक्षणाखाली असलेले दुसरे तेलवाहू जहाज बेकायदेशीर मार्गाने गुपचूप प्रवास करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्याबाबतही एक घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode