
ठाणे, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। स्पोर्टिंग क्लब ठाणेने धमाकेदार कामगिरी करत 'शताब्दी चषक १४ वर्षा खालील आंतर-क्लब क्रिकेट स्पर्धा २०२६-२७' च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. ठाणे रॉयल संघा विरुद्ध पहिल्या डावाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब ने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
या सामन्यात दोन्ही संघांकडून फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळाले. स्पोर्टिंग क्लब ठाणेच्या अद्वैत काचराजने १६७ चेंडूत १४० धावांची शानदार खेळी केली. या स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे शतक ठरले, ज्याच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब ठाणेने ७५ षटकांत ३१४ धावांचा टप्पा गाठला.
त्याला चोख प्रत्युत्तर देत ठाणे रॉयल संघाच्या सलामीवीर विहंग कदमने १७२ चेंडूत १३८ धावांची झुंजार खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांकडून पुरेशी साथ न मिळाल्याने त्याची ही खेळी अपयशी ठरली. ठाणे रॉयलचा संघ ७३ षटकांत २३५ धावांवर आटोपला.
ठाणे रॉयल तर्फे एकांश धामुनसे (४/५०) आणि वेदांत ठोंबरे (३/५५) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत स्पोर्टिंग क्लबला आणखी मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. स्पोर्टिंग क्लबच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले. विहान असावले, अद्वैत काचराज, पार्थ राऊत आणि अभय यांनी प्रत्येकी २ बळी घेत पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
स्पोर्टिंग क्लब ठाणे आता अंतिम सामन्यात मांडवी मुस्लिम आणि माझगाव सीसी यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्या संघाविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर