
लातूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। चाकूर येथे ब्रह्माकुमारी संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या दिव्य दर्शन भवनाचा उद्घाटन सोहळा ब्रह्माकुमारी जयंती दीदी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या भवनाच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यासाठी शासनाच्या स्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीदेखील यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
ब्रह्माकुमारी दीदी समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे आणि आध्यात्मिक मूल्यांची रुजवण करण्याचे महान कार्य करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजाला शांती, आत्मिक समाधान आणि सकारात्मक विचारांची नितांत आवश्यकता आहे. हीच गरज ओळखून चाकूर येथे उभारण्यात आलेले ‘दिव्य दर्शन भवन’ समाजात चांगले परिवर्तन घडविण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
आज मराठवाड्यासह महाराष्ट्रात विविध आव्हानात्मक परिस्थिती असतानाही समाजामध्ये शांती, संयम, बंधुभाव आणि सकारात्मकतेचा संदेश पोहोचविण्याचे कार्य ब्रह्माकुमारी संघटना करत आहे. ईश्वरभक्ती ही अंतःकरणापासून केली पाहिजे. या भवनाच्या माध्यमातून चाकूर शहरातील नागरिकांना आध्यात्मिक विचारांची आणि आत्मिक उन्नतीची नवी दिशा मिळेल, असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी यावेळी व्यासपीठावर, खा. डॉ . शिवाजीराव काळगे, डॉक्टर चंद्रप्रकाश नागिमे ( चेअरमन खरेदी विक्री संघ चाकूर ), राजेंद्र मायने ( उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर ), बालाजी बंडे पोलीस निरीक्षक नगराध्यक्ष भागवत फुले, माजी उपनगराध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, मोहनराव पाटील चाकूरकर, राजयोगिनी ब्रम्हाकुमारी हंसा दीदी,राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सोमप्रभा दीदी,राजयोगिनी ब्रम्हाकुमार रुपेश भाई,राजयोगिनी ब्रम्हाकुमार भरत भाई,राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनीता बहन, राजयोगिनी ब्रम्हाकुमारी प्रतिमा दीदी, राजयोगिनी ब्रम्हाकुमारी संगीता बहन राजयोगिनी ब्रम्हाकुमारी नंदा बहन, आयोजक ब्रह्माकुमारी महानंदा दीदी, ज्योती बहन व चाकूर शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis