
रत्नागिरी, 12 नोव्हेंबर, (हिं.स.) । समान नागरी कायद्याबाबत विविध हितसंबंधी गट, संस्था व नागरिकांच्या सूचना, हरकती आणि मते जाणून घेण्यासाठी शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे कोकण विभागाची जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याची सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार आहे.
जनसुनावणी २१ व २२ नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई येथे होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याची जनसुनावणी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली आहे.
विभागीय आयुक्त (कोकण विभाग) रुबल अग्रवाल यांच्यामार्फत कोकण विभागातील नागरिकांना या जनसुनावणीत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित गट, संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांना विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय (समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन, नवी मुंबई) किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय येथे निर्धारित दिवशी, निर्धारित वेळेपूर्वी १ तास अगोदर उपस्थित राहता येईल. नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी समितीसमोर समक्ष घेण्यात येईल, तर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार आहे.
ज्या नागरिकांना प्रत्यक्ष किंवा व्हीसीद्वारे उपस्थित न राहता केवळ ऑनलाइन पद्धतीने आपले मत सादर करावयाचे आहे, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या https://ucc.maharashtra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर ३७ मुद्द्यांच्या आधारे आपली माहिती व मते नोंदविता येतील, असेही प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी