दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वन क्षेत्रातील गवताचा लिलाव बंद; पशुपालकांना चारा उपलब्ध होणार
वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे, सौरपंप आणि टँकरची व्यवस्था सोलापूर, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन आणि वन्यप्राण्यांसमोर निर्माण होणारी चारा व पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वन व
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वन क्षेत्रातील गवताचा लिलाव बंद; पशुपालकांना चारा उपलब्ध होणार


वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे, सौरपंप आणि टँकरची व्यवस्था

सोलापूर, १२ नोव्हेंबर (हिं.स.) : दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन आणि वन्यप्राण्यांसमोर निर्माण होणारी चारा व पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रातील गवताचा लिलाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हे गवत स्थानिक पशुपालकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे दुष्काळाच्या काळात पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

वनक्षेत्रातील गवताचे वितरण आणि वापर करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे बंधनकारक करण्यात आले आहे. गवताची कापणी, बांधणी आणि वाहतुकीसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. चाऱ्याची तातडीने कापणी करून त्याची साठवण व वितरण करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), कंपन्या तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या संस्थांची मदत घेतली जाणार आहे. याशिवाय, चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या वनजमिनी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, वाढत्या उन्हामुळे आणि दुष्काळामुळे वन्यप्राण्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी वन विभाग आणि वनविकास महामंडळामार्फत विशेष कृती आराखडा राबविण्यात येत आहे. या आराखड्यांतर्गत जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे, वनतळी, वॉटर होल्स, टँकर, सौरपंप, नवीन बोअरवेल आणि मातीचे बंधारे उभारण्यात येणार आहेत.

तसेच, जंगल परिसरातील सध्या अस्तित्वात असलेल्या पाणवठ्यांची तपासणी करून त्यांची सद्यस्थिती आणि पाण्याची उपलब्धता निश्चित केली जाणार आहे. या उपाययोजनांमुळे दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला चारा आणि वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande