
सोलापूर, 12 नोव्हेंबर, (हिं.स.)। ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीत सोलापूर जिल्ह्यात असमान प्रगती दिसून येत आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये मंजूर असलेल्या एकूण १ हजार ३२९ योजनांपैकी आतापर्यंत केवळ ७४७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित ५८२ योजनांची कामे अद्याप अपूर्ण आहेत.
जिल्ह्यात एकूण योजनांपैकी सुमारे ५६ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तालुकानिहाय प्रगतीचा विचार करता माळशिरस तालुक्याने १२४ योजना पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर बार्शी तालुक्यात ९५, सांगोल्यात ८८ आणि मंगळवेढ्यात ७५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.
दुसरीकडे, उत्तर सोलापूर तालुका या कामांमध्ये सर्वात मागे आहे. या तालुक्यात मंजूर असलेल्या ४० योजनांपैकी केवळ १३ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातही कामांची गती अपेक्षेप्रमाणे नसून, मंजूर ९४ योजनांपैकी अवघ्या ४१ योजना पूर्ण झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असताना जलजीवन मिशनच्या कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे. निधीअभावी अनेक योजना रखडल्याची माहिती पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
योजनांची कामे पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे रखडलेल्या योजनांना गती देऊन त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड