
कोल्हापूर, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। कोल्हापूर शहरात कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आणि कर आकारणी टाळून विनापरवाना व्यवसाय चालविणाऱ्या आस्थापनांविरोधात कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत कठोर पावले उचलण्यात आली आहेत. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निर्देशानुसार आज जरगनगर येथील योगेश्वरी कॉलनी, जगतापनगर परिसरात संयुक्त पथकाने धडक मोहीम राबवली.
महानगरपालिकेचे परवाना विभाग, घरफाळा विभाग, विभागीय कार्यालय क्र. १ (गांधी मैदान) आणि उपद्रव शोध पथकाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत विनापरवाना सुरू असलेली 'जॅग्वार जिम' सील केली आहे. याच परिसरातील विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या 'हॉटेल ओ' या आस्थापनास कायदेशीर कागदपत्रे व परवान्यासाठी ६ दिवसांची सक्त नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित आस्थापनांना यापूर्वीच व्यवसाय परवाना घेणे व आवश्यक भाडेकरार सादर करण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्याने मनपाने ही दंडात्मक व कठोर सीलबंद कारवाई केली आहे. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे व करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधीक्षक दत्तप्रसाद माजगावकर, उपद्रव शोध पथक व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
शहरातील सर्व मिळकतधारक व व्यावसायिकांनी आपल्याकडील थकीत घरफाळा तातडीने भरावा, आवश्यक व्यवसाय परवाने व कागदपत्रांची पूर्तता करून महापालिकेला सहकार्य करावे. विनापरवाना व्यवसाय आणि कर थकीत ठेवणाऱ्यांवर यापुढेही अशीच धडक कारवाई आणखी तीव्र स्वरूपात सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar